१५ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर कोमुनिदादचे यश
म्हापसाः थिवी कोमुनिदादच्या जागेत बेकायदेशीररित्या बांधलेल्या औचितवाडा माडेल येथील 'लाला की बस्ती'मधील २३ घरे अखेर जमीनदोस्त करण्यात आली. १५ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर थिवी कोमुनिदादला हे यश आले असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी १५ रोजी सकाळी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक कार्यालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही अतिक्रमण हटाव पथकाच्या सहाय्याने केली. यावेळी पाच पोलीस निरीक्षकांसह २०० पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी बार्देशचे दंडाधिकारी मालमेदार अनंत मळीक, संयुक्त मामलेदार साईश नाईक, उव्वल कारकून शैलेश कोठावळे तसेच कोमुनिदाद अॅटर्नी सावियो परेरा उपस्थित होते. दुपारपर्यंत अतिक्रमण हटाव पथकाने जवळपास १५ घरे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. तर सायंकाळी उशीरापर्यंत सर्व घरे पाडणे शक्य न झाल्यास ही कारवाई बुधवारी १६ रोजी सकाळी हाती घेण्यात येणार आहे.
कोमुनिदाद जागेत अवैधरित्या उभारण्यात आलेल्या २३ घरांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक पांडुरंग गाड यांनी नोटिसा बजावून घरे पाडण्याचे निर्देश दिले होते. शिवाय स्वतःहून बांधकाम पाडून जागा पूर्वपदी आणण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला होता. शिवाय दिलेल्या मुदतीत घरे हटवली गेली नाही, तर ती पाडली जातील, असा इशारा प्रशासकांनी आदेशात दिला होता. ही मुदत ११ मार्च रोजी संपली होती. मात्र नंतर ऐनवेळी ही कारवाई थांबवण्यात आली होती.
समितीची २००८ मध्ये न्यायालयात धाव
कोमुनिदादच्या जागेवरील हे बेकायदा अतिक्रमण थांबवण्यासाठी थिवी कोमुनिदाद व्यवस्थापन समितीने २००८ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. कनिष्ठ न्यायालयाने ही बांधकामे हटवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला संबंधितांना उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र गेल्या २०२३ मध्ये ही याचिका फेटाळून कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करण्याचे निर्देश उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांना दिले होते.
राजकीय आशिर्वादाने उभारली बांधकामे
थिवी कोमुनिदादच्या ८ हजार चौरस मीटर जागेवर अतिक्रमण करून ही घरे बांधण्यात आली होती. यासाठी संबंधित अधिकार्यांकडून परवानगी घेण्यात आली नाही. या अतिक्रमण करून झालेल्या वसाहतीला 'लाला की बस्ती' म्हणून ओळखले जाते. पूर्वी थिवीमध्ये काही स्थलांतरित राहत होते.
त्यावेळी राजकीय आशिर्वादामुळे कोमुनिदाद जागेवर अतिक्रमण करून ही बांधकामे उभी राहिली होती. या कोमुनिदादच्या जमिनीचे कुळ (टेनंन्ट) म्हणून थिवीचे तत्कालीन सरपंच लाला इस्माईल बेपारी हे होते. त्यामुळे या वसाहतीला लाला की बस्ती हे नाव देण्यात आले होते.
१५ वर्षींनंतर कोमुनिदादीला न्याय - सावियो परेरा
न्यायालयाच्या आदेशानुसार थिवी कोमुनिदादच्या जागेतील २३ अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. १५ वर्षे न्यायालयीन लढाईनंतर कोमुनिदादीला शेवटी न्याय मिळाला आहे. राज्य सरकार, सरकारी यंत्रणा व कोमुनिदादचे गावकर यांच्या मदतीने हे शक्य झाले आहे. कोमुनिदाद जागेत बिनधास्तपणे बेकायदा बांधकामे करा. काहीच कारवाई होणार नाही असा जो समज आहे, त्याला ही कारवाई म्हणजे उत्तर आहे.
- सावियो परेरा, अॅटर्नी - थिवी कोमुनिदाद