मडगाववासीयांना लवकरच ‘अच्छे दिन’ : मुख्यमंत्री​

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या संकेतांना दिली बळकटी; घरे नियमित करण्याचीही हमी


13 hours ago
मडगाववासीयांना लवकरच ‘अच्छे दिन’ : मुख्यमंत्री​

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगावला ‘अच्छे दिन’ कधी येतील, असे आमदार दिगंबर कामत आपल्याला कधीही​ विचारत नाहीत. पण, नगरसेवक मात्र आपल्याला विचारत असतात. मडगाववासीयांसाठी ‘अच्छे दिन’ लवकरच येतील, असे सांगत, लोकांची घरे निय​मित करण्याचा निर्णय लवकरच घेण्याची तसेच पालिका कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुविधा देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी​ केली.
मडगावातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिगंबर कामत यांच्यासह मडगाव भाजपचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ फेरबदल होण्याच्या चर्चा वारंवार झडत आहेत. त्यात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री डॉ. सावंत भाजपच्या मडगावातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काय भाष्य करणार, याकडे मडगाववासीयांचे लक्ष लागून होते. अशा स्थितीत मडगावला लवकरच ‘अच्छे दिन’ येतील असे म्हणत, दिगंबर कामत यांना मंत्रिपद देण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले. न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील काही भागांतील घरे पाडली जात आहेत. पण, लोकांची घरे नियमित करून ती वाचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पालिका कर्मचाऱ्यांबाबत ठाम निर्णय घेण्याची मागणी​ आमदार दिगंबर कामत यांच्याकडून आपल्याकडे वारंवार होत होती. त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून, त्यांनाही पुढील काळात सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुविधा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप जात, धर्म पाहत नाही !
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार जात-धर्म, गरीब-श्रीमंत हे बघून काम करत नाही. देशातील नागरिकांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारकडून सुरू आहे. याची खात्री पटल्यामुळेच दिगंबर कामत काँग्रेसमधून भाजपात आले. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेही भाजपवासी झाले. या सर्वांना सोबत घेऊन पक्ष पुढे चालत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
‘बुलबूल’ पुढील वर्षीही मडगावातच !
राज्य सरकारने यंदा प्रथमच आयोजित केलेला ‘बुलबूल’ महोत्सव पुढील वर्षीही मडगावातच आयोजित करण्यात येणार आहे. सर्वच बाबतीत पणजीप्रमाणे​ मडगावचाही विकास करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. त्यानुसार मडगावच्या विकासाची प्रक्रिया सुरू राहील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.