तिघांना अटक : गोवा पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई
जप्त करण्यात आलेले कोकेन.
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : क्राईम ब्रँचने सोमवारी रात्री चिकोळणा बसस्थानक परिसरात छापा टाकून ४३.२० कोटी रुपये किमतीचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले. याप्रकरणी निबू व्हिन्सेंट (४५, मूळ कोलकता) याच्यासह मंगेश आणि रेश्मा वाडेकर या पती-पत्नीला अटक केली. ही गोवा पोलिसांची ड्रग्जविरोधातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. क्राईम ब्रँचचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गुप्ता यांनी सांगितले की, क्राईम ब्रँचला चिकोळणा येथे काही व्यक्ती ड्रग्ज वितरीत करणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर, प्रशल नाईक देसाई, पोलीस उपनिरीक्षक प्रगती मळीक यांच्यासह कॉन्स्टेबल सैमुल्ला मकानदार, नवीन पालयेकर, सुजय नाईक, राहुल नाईक, रोशनी शिरोडकर, निगम खोत यांनी सोमवारी रात्री चिकोळणा बसस्थानक परिसरात तपासणी केली. यावेळी संशयिताच्या बॅगेत चॉकलेट आणि कॉफीच्या पाकिटात लपवलेला कोकेनसदृश पदार्थ सापडला. पदार्थाची चाचणी केल्यावर तो कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस चौकशीत संशयिताने मंगेश आणि रेश्मा वाडेकर (सडा) आपले साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक सर्वेक्षण करून या पती-पत्नीला मंगळवारी दुपारी अटक केली. यापूर्वी या दोघांवरही अन्य गुन्हे दाखल आहेत. हे कोकेन रेश्मा हिला कुणीतरी दिले असून ती ते विकण्याचा प्रयत्न करत होती. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे राहुल गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान, वास्को प्रथमवर्ग नायालयाने तिघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तीन महिन्यांतील आठवी कारवाई
राहुल गुप्ता यांनी सांगितले की, गोवा पोलिसांच्या विविध विभागांनी मिळून २०२४ मध्ये सुमारे १० कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले होते. २०२५ च्या पहिल्या साडेचार महिन्यांत क्राईम ब्रँचने ५५.२७ कोटी रुपये किमतीचे १९.२३ किलो अमलीपदार्थ जप्त केले आहेत. याअंतर्गत ८ गुन्हे दाखल झाले असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
गोवा पोलिसांच्या कारवाईचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कौतुक केले आहे. ही कारवाई सरकारची अमलीपदार्थांच्या विरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईतील वचनबद्धता, दक्षता दर्शवते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.