यंदा सरासरीपेक्षा अधिक मान्सून

हवामान खात्याचा अंदाज


13 hours ago
यंदा सरासरीपेक्षा अधिक मान्सून

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हवामान खात्याने मंगळवारी मान्सूनचा लांब पल्ल्याचा पहिला अंदाज जारी केला. यानुसार यंदा राज्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक मान्सूनची शक्यता आहे. यंदात देशात सरासरीच्या १०५ टक्क्यांपर्यंत मान्सून पावसाची शक्यता आहे. याआधी एपीईसी आणि स्कायमेट या खासगी संस्थांनी मान्सून सरासरी एवढाच असण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
प्रशांत महासागरात मान्सूनसाठी पूरक असणारी ‘ला निना' परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. ‘एल निनो' परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. खात्यानुसार मान्सून कालावधीत (जून ते सप्टेंबर) एनस्नो आणि आयओडी स्थिती तटस्थ राहण्याची शक्यता असल्याने अधिक पावसाची शक्यता आहे. खात्याचा हा प्राथमिक अंदाज असून अधिक तपशीलवार अंदाज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.
खात्याच्या अंदाजानुसार, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ३३ टक्के, सरासरीहून अतीजास्त पावसाची शक्यता २६ टक्के, सरासरी एवढाच पावसाची शक्यता ३० टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ९, तर अत्यल्प पावसाची शक्यता केवळ २ टक्के आहे.
पणजीत पारा ३५ अंश
मंगळवारी पणजीत कमाल ३५ अंश, तर किमान २६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव येथील कमाल तापमान ३४.२ अंश व किमान तापमान २६.८ अंश सेल्सिअस होते.

हेही वाचा