बिग ब्रेकिंग! चिकोळणा येथे तब्बल ४३.२० कोटींचे कोकेन जप्त; तिघांना अटक

गोवा पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 03:02 pm
बिग ब्रेकिंग! चिकोळणा येथे तब्बल ४३.२० कोटींचे कोकेन जप्त; तिघांना अटक

पणजी : क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री चिकोळणा बस स्थानक परिसरात छापा टाकून ४३.२० कोटी रुपये किंमतीचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले. याप्रकरणी निबू व्हिन्सेंट (४५, मूळ कोलकता) याच्यासह मंगेश आणि रेश्मा वाडेकर या पती पत्नीला अटक केली आहे. ही गोवा पोलिसांची ड्रग्ज विरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे क्राईम ब्रांच पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांचला चिकोळणा येथे काही व्यक्ती ड्रग्ज वितरित करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक लक्ष्मी आमोणकर, प्रशल देसाई यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल सैमुल्ला मकानदार, नवीन पालयेकर, सुजय नाईक, राहुल नाईक, रोशनी शिरोडकर, निगम खोत यांनी सोमवारी रात्री चिकोळणा बस स्थानक परिसरात तपासणी केली. यावेळी संशयिताच्या बॅगेत चॉकलेट आणि कॉफीच्या पाकिटात लपवलेला कोकेन सदृश पदार्थ सापडला.

सापडलेल्या पदार्थाची चाचणी केल्यावर तो कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस चौकशीत संशयिताने मंगेश आणि रेश्मा वाडेकर (राहणार, सडा) हे आपले साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक सर्वेक्षण करून या पती-पत्नीला मंगळवारी दुपारी अटक केली. यापूर्वी या दोघांवरही अन्य गुन्हे दाखल झाले होते. व्हिन्सेंट काही दिवसांपूर्वी थायलंड येथे जाऊन आला होता. कोकेन कुठून आले आणि ते कुणाला देण्यात येणार होते, याविषयी तपास सुरू असल्याचे राहुल गुप्ता यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदनः-
गोवा पोलिसांच्या कारवाईचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले आहे. ही कारवाई सरकारची अंमली पदार्थांच्या विरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईतील वचनबद्धता, दक्षता दर्शवते अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.



(अशा पद्धतीने चॉकलेटच्या कागदामध्ये रॅपकरून कोकेनची हाताळणी केली जात होती. )