शिक्षण संचालक : पुढील वर्षापासून सहा वर्षे पूर्ण झालेल्यांनाच पहिलीत प्रवेश
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्याचे हे अखेरचे वर्ष असणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची (एनईपी) राज्यात अंमलबजावणी झाल्याने २०२६-२७ च्या शैक्षणिक वर्षापासून १ जून २०२६ रोजी सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी मंगळवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
‘एनईपी’ची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून सुरू झाल्यामुळे यंदापासून सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार की गोव्याच्या कायद्यानुसार साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्यांना प्रवेश मिळणार, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला असतानाच १ जून २०२५ रोजी साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना भागशिक्षणाधिकाऱ्यांनी शालेय संस्थांना केल्या. त्यामुळे राज्यभरातील पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले. या पार्श्वभूमीवर, शिक्षण संचालक झिंगडे यांच्याशी संपर्क साधला असता, साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्याचे हे अखेरचे वर्ष असणार आहे. त्यामुळे यंदा साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्यांना पहिलीत प्रवेश मिळेल; परंतु २०२६-२७ च्या शैक्षणिक वर्षापासून सहा वर्षे पूर्ण झालेल्यांनाच पहिलीत प्रवेश मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी शिक्षण खात्याने सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले होते. त्यावरून काही पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने पालकांना दिलासा दिला होता. त्यानंतर गतवर्षी ‘एनईपी’नुसार सहा वर्षांपेक्षा अधिक वयाच्याच विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गतवर्षी सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. त्याचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने दोन वर्षे गोव्याच्या कायद्यानुसारच साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश दिला आणि केंद्राच्या निर्देशांचे २०२६-२७ पासून पालन करण्याचा निर्णय घेतला होता.
‘अक्षयपात्र’चा माध्यान्ह आहार जूनपासून
माध्यान्ह आहाराचे कंत्राट मिळवलेल्या ‘अक्षयपात्र’ने पहिल्या टप्प्यात २,५०० विद्यार्थ्यांना आहार देण्याची पूर्ण तयारी केली आहे. १ एप्रिलपासून आहार देण्याचे नियोजनही त्यांनी केले होते; परंतु आहारासाठी आवश्यक धान्ये सरकारकडून त्यांना मिळाली नसल्यामुळे ही प्रक्रिया थांबली आहे.
‘अक्षयपात्र’ला माध्यान्ह आहारासाठी धान्ये देण्याच्या खर्चास सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पुढील काही दिवसांत सरकारची मंजुरी मिळेल. त्यामुळे जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर २,५०० विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’चा माध्यान्ह आहार मिळेल, असे संचालक झिंगडे म्हणाले.
‘अक्षयपात्र’ने पिळर्ण येथे सुसज्ज असे स्वयंपाक घर उभारले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बार्देश, डिचोली आदी आसपासच्या तालुक्यांतील काही शाळांतील विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’चा माध्यान्ह आहार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.