सांत आंद्रे : हॉटेल ग्रँड हयातला जीसीझेडएमएचा दणका

बेकायदा बांधकाम बंद करण्यासह पाडण्याची नोटीस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
16th April, 03:56 pm
सांत आंद्रे  : हॉटेल ग्रँड हयातला जीसीझेडएमएचा दणका

पणजी :हॉटेल ग्रँड हयातचे बांबोळी येथे सर्वे क्रमांक १२/१ व ९९/२मध्ये असलेले बांधकाम हे सीआरझेड नियम भंग करणारे असल्याने ते बंद करण्याचा आदेश गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) दिला आहे. तसेच हे बांधकाम मोडण्यासंबंधीची नोटीसही बजावली आहे. याबाबतची सुनावणी २४ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता पाटो - पणजी येथील जीसीझेडएमएच्या कार्यालयात होणार आहे. यावेळी हॉटेलच्या अधिकृत अधिकाऱ्याने बांधकाम तसेच जीसीझेडएमएचे परवाने सादर करणे आवश्यक आहे.

बांबोळी येथे हॉटेल ग्रँड हयातने सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असून, हे बेकायदा बांधकाम सुरू असल्याची तक्रार स्थानिक आमदार विरेश बोरकर, प्रा. रामराव वाघ तसेच इतरांकडून करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (जीसीझेडएमए) ​अधिकाऱ्यांनी बांधकामाची पाहणी केली. बांबोळी येथील सर्वे क्रमांक १२/१ व ९९/२ मध्ये १० मीटर लांबीचे व ३.२ मीटर उंचीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 

हे क्षेत्र सीआरझेड - ३ मध्ये येते. सीआरझेड अधिसूचना २०११ प्रमाणे नदीपासून १०० मीटर व समुद्रापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यासाठी जीसीझेडएमएकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. हे बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.


हेही वाचा