युरोप : फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला बेल्जियममध्ये अटक

प्रत्यर्पणासाठी भारताची तयारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th April, 11:00 am
युरोप : फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला बेल्जियममध्ये अटक

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. हाती आलेल्या महितीनुसार, सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १३ एप्रिल  रोजी बेल्जियमच्या स्थानिक पोलिसांनी चोकसीला ताब्यात घेतले असून, त्याला सध्या बेल्जियममधील एका जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

प्रत्यर्पणासाठी भारताची तयारी

भारतीय यंत्रणांनी चोकसीच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू केली असून, या संदर्भात बेल्जियम सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे. अटकेच्या वेळी पोलिसांनी मुंबईतील एका न्यायालयाने जारी केलेल्या २ अटक वॉरंट्सचा हवाला दिला. हे वॉरंट्स २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते. दरम्यान, चोकसी आपल्या प्रकृतीचे कारण सांगून जामिनासाठी आणि तात्काळ सुटकेसाठी अर्ज करू शकतो. यापूर्वीही त्याने अनेक वेळा असे प्रयत्न केले होते.

१३,८५० कोटींचा घोटाळा

चोकसीवर १३,८५० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी याच्याबरोबर मिळून त्याने पीएनबि बँकेला गंडा घातल्याचा आरोप सीबीआय व ईडीने केला आहे. मेहुल चोकसी बेल्जियममध्ये आपल्या पत्नी प्रीती चोकसीसह वास्तव्यास असल्याची माहिती गेल्या महिन्यात समोर आली होती. प्रीतीकडे  बेल्जियमचे नागरिकत्व असल्याने मेहुलने तेथे आश्रय घेतल्याचे बोलले जात आहे. चोकसीची उपस्थिती बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयानेच भारताला कळवली होती.


हेही वाचा