कुशावती जिल्ह्यामुळे चार तालुक्यांचा होणार कायापालट!

मुख्यमंत्री डॉ. सावंत : आमोणे-पैंगीण येथे ‘आदी लोकोत्सव’चा समारोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th January, 11:49 pm
कुशावती जिल्ह्यामुळे चार तालुक्यांचा होणार कायापालट!

मान्यवरांचा सत्कार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मंत्री रमेश तवडकर, बाबू कवळेकर व इतर.

काणकोण : नव्याने होणाऱ्या कुशावती (Kushavati) जिल्ह्यामुळे काणकोणसह केपे, सांगे, कुडचडे आणि धारबांदोडा या तालुक्यांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. या जिल्ह्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ५०० कोटी रुपयांची मागणी केली असून, यामुळे पायाभूत सुविधांसोबतच युवक व महिलांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले.
आमोणे-पैंगीण येथे आयोजित रौप्यमहोत्सवी ‘आदी लोकोत्सवा’च्या (Adi Folk Festival) समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व अनेक पंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते.कुशावती जिल्ह्याला होणाऱ्या विरोधावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोध करणाऱ्यांना विरोध करू द्या, मात्र लवकरच काणकोणवासीयांना या जिल्ह्याचे सविस्तर प्रेझेंटेशन दाखविण्यात येईल. काणकोणमध्ये नवे जिल्हा रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली. रमेश तवडकर यांचे नेतृत्व अंत्योदय तत्त्वावर चालणारे असून ते ग्रामीण भागासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामसिंग राठवा, कॅप्टन बॉबी अजमेरा यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच बलराम शिक्षण संस्थेच्या ग्रंथांचे प्रकाशनही यावेळी पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गावकर यांनी केले. तर चंद्रकांत वेळीप यांनी आभार मानले.
आदिवासी विकास हाच ध्यास : मंत्री तवडकर
काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकांचे प्रेम हीच आमची खरी शक्ती आहे. केवळ राजकारणासाठी जिल्ह्याला विरोध करणे चुकीचे असून, या माध्यमातून आदिवासी समाजाचा खरा विकास साधला जाणार आहे. ग्रामीण जनतेच्या सुख-समृद्धीसाठी ‘ध्यास पर्व’ कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जातीभेद विसरून सण साजरा करणे हीच आपली खरी अस्मिता आहे. ‘आदी लोकोत्सव’ हा केवळ उत्सव नसून तो लोकशहाणपणाची शिदोरी देणारे माध्यम आहे.
- श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री             

हेही वाचा