प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई यांचा संतप्त सवाल

पेडणे : पार्से (Parse) येथील श्री सातेरी भगवती कला आणि सांस्कृतिक मंडळाने तुये येथील रैना मैदानावर (Raina Maidan) आयोजित केलेला ‘अभंग वारी अभंग रिपोस्ट’ (Abhang Wari Abhang Repost) हा सांस्कृतिक कार्यक्रम उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवान्याअभावी रद्द केला. प्रशासनाच्या या कारवाईवर पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई (Devendra Prabhudesai) यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत.
ग्रामीण भागात संस्कृतीला चालना देण्यासाठी या भव्य भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी हा कार्यक्रम सुरू करण्यास मज्जाव केला. जर अभंगाच्या कार्यक्रमाला परवान्यांची गरज असेल, तर मग किनारी भागात रात्री-अपरात्री चालणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीत पार्ट्यांना, बेकायदा बैलांच्या झुंजींना आणि जुगार अड्ड्यांना परवाने कोण देतो? असा संतप्त सवाल प्रभुदेसाई यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर आणि तुयेचे पंच उदय मांद्रेकर उपस्थित होते. या कारवाईमुळे केवळ स्थानिकच नव्हे, तर परराज्यातून आलेल्या संगीतप्रेमींनाही रिकाम्या हाती परतावे लागले.
ड्रग्ज पार्ट्यांवर कारवाई का नाही?
प्रभुदेसाई पुढे म्हणाले की, कोस्टल बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या रेव्ह पार्ट्या आणि ड्रग्ज पार्ट्या सुरू आहेत, ज्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. अशा पार्ट्यांविरुद्ध तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नाहीत, मात्र एका चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मात्र तांत्रिक कारणावरून रोखले जाते, हा अन्यायकारक प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले.