युनिटी मॉलविरोधात चिंबल ग्रामस्थांचे आंदोलन, तर बार्देशात तीन आगीच्या घटनांमुळे नुकसान

पणजी : चिंबल येथील ‘युनिटी मॉल’ रद्द करण्यासाठी चिंबल ग्रामस्थांनी आंदोलन केले. पणजीत गोवा वाचविण्यासाठी नागरिकांची सभा झाली. करमळी (तिसवाडी) येथील वादग्रस्त मेगा प्रकल्पाविरोधात आरजीपीची नगरनियोजन कार्यालयावर धडक याशिवाय बार्देश तालुक्यात, राय येथे आगीच्या घडना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

युनिटी मॉल’ रद्द करण्यासाठी चिंबल ग्रामस्थांचे आंदोलन
चिंबल येथील ऐतिहासिक तोयार तलावाच्या परिसरात प्रस्तावित असलेला ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासन स्तंभ’ प्रकल्प जोपर्यंत पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण आणि लढा सुरूच ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार चिंबल ग्रामस्थांनी केला.
आयएएस मायकल डिसोझा, निखिल देसाई पुन्हा गोव्यात
केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘अॅग्मुट’ कॅडरमधील भारतीय प्रशासकीय (आयएएस) आणि पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, गोव्याचे आयएएस अधिकारी मायकल डिसोझा, निखिल देसाई आणि आयपीएस अधिकारी शेखर प्रभुदेसाई यांची पुन्हा गोव्यात बदली करण्यात आली आहे.
थिवी, मयडेत दोन वृद्ध महिलांचा बुडून मृत्यू
थिवी व मयडे येथे नदीच्या पात्रात बुडून दोघा वृद्ध महिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोलवाळ व म्हापसा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनांची नोंद केली असून दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉमध्ये पाठवून दिले आहेत.
सोमवार
कळंगुट समुद्रकिनारी महिलेचा विनयभंग
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात पर्यटकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देवबाग-काणकोण येथे पर्यटकांचे तीन लॅपटॉप लंपास
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी काणकोणात आलेल्या पर्यटकांना चोरीचा फटका बसला आहे. देवबाग येथील एका गेस्ट हाऊसमधून मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांचे एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचे वेगवेगळे तीन लॅपटॉप अज्ञातांनी पळवले.
घरात पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
घरात पडल्याने डोके भिंतीवर आपटून जखमी झालेल्या आगाळी येथील जुवांव फर्नांडिस यांचा गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. फातोर्डा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे. आगाळी फातोर्डा येथील ५८ वर्षीय जुवांव फर्नांडिस हे घरात पडल्याने भिंतीवर डोके आपटून जखमी झाले होते.
मंगळवार
पणजीत गोवा वाचविण्यासाठी सभा
गोवा वाचवण्यासाठी पणजीत आयोजित सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. गोवा वाचवण्यासाठीची चळवळ पुढे नेण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल. गाव तसेच तालुका स्तरांवर समिती स्थापन केल्या जातील, असेही सभेत सांगण्यात आले.

बार्देश तालुक्यात आगीच्या घटना
बार्देश तालुक्यात आग लागण्याच्या तीन दुर्घटना घडल्या. पर्वरीतील ‘घरान’ रेस्टॉरंट भीषण आगीत भस्मसात झाले. नायकावाडा, कळंगुट येथील बांधकाम सुरू असलेल्या ‘सागा’ हॉटेलचा गोदाम आणि खोर्ली म्हापसा येथील प्रमोद कर्पे यांच्या घरातील साहित्य आगीत जळाले. तिन्ही दुर्घटनांमध्ये अंदाजे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आरजीपीची टीसीपी कार्यालयावर धडक
करमळी (तिसवाडी) येथील वादग्रस्त मेगा प्रकल्पाविरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) नगर नियोजन (टीसीपी) कार्यालयावर धडक दिली होती. त्यानंतर खात्याने वेगवान हालचाली करून या प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश उपनगर नियोजकांनी दिले.
वेबसाईटवरून लग्न जुळविण्याच्या नादात गमावले १.४१ कोटी
वधू शोधण्यासाठी वधू-वर सूचक संकेतस्थळावर नोंदणी करणे ५८ वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. वधू तर मिळाली नाहीच, उलट ‘समसिया बेगम’ हे नाव धारण केलेल्या व्यक्तीने फाॅरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून तब्बल १.४१ कोटींचा गंडा घातला.
बुधवार
दोन पोलीस निरीक्षक, ९ उपनिरीक्षकांसह ८३ कर्मचाऱ्यांची बदली
पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार गोवा पोलीस खात्यातील २ निरीक्षक आणि ९ उपनिरीक्षकांसह ८३ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मुख्यालयाचे अधीक्षक धर्मेश आंगले यांनी जारी केला आहे.
लुथरांच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात हस्तक्षेप याचिका
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या क्लबसाठी अबकारी खात्याचा परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट दाखला वापरल्याने संशयित आरोपी लुथरा बंधूंच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात दिल्लीतील पीडित जोशी कुटुंबीयांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

सुरावलीत धिरयो
सुरावली येथे धिरयोचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाकडून स्थापन समिती घटनास्थळी पोहोचताच सुरावली येथील धिरयो आयोजकांसह बघ्यांची गर्दी पांगली.
गुरुवार
गोव्याच्या लोकायुक्तपदी निवृत्त न्या. संदीप शिंदे
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची गोव्याचे चौथे लोकायुक्त म्हणून नियुक्ती निश्चित झाली. २० डिसेंबर २०२४ पासून हे पद रिक्त होते. राज्याला आतापर्यंत लाभलेल्या तीन लोकायुक्तांपैकी केवळ दोघांनीच आपला निर्धारित कार्यकाळ पूर्ण केला आहे.
विधानसभेतील प्रश्नाच्या चोरीच्या आरोपातून काशीनाथ शेट्ये मुक्त
वीज खात्याचे तत्कालीन अभियंते काशीनाथ शेट्ये यांच्याविरोधात विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाबाबत चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शेट्ये यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यासाठी प्रथमदर्शनी कोणतेही पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने काशीनाथ शेट्ये यांना चोरीच्या आरोपातून मुक्त केले.
राय येथील टेकडीवर चौथ्यांदा लागली आग
राय येथील टेकडीवरील गवताला गेल्या काही दिवसांत चौथ्यावेळी आग लागण्याची घटना घडली. डोंगरात गाडी जात नसल्याने आगीवर नियंत्रण आणताना मडगाव अग्निशामक दलाची दमछाक झाली.
शुक्रवार

पर्रा नागनाथ महादेव मंदिरात चोरी
लिंगाभाट, पर्रा येथील श्री नागनाथ महादेव मंदिरात चोरांनी फंडपेटीतील सुमारे ३५ हजार रुपये लंपास करीत नंदीच्या मूर्तीची देखील मोडतोड केली. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे हल्लीच नादुरूस्त होऊन बंद पडल्यामुळे चोरांची छबी त्यात बंदीस्त होऊ शकली नाही.
मार्टीन सुवारीसची १० वर्षांची शिक्षा कायम
२०१२ मध्ये म्हापसा पोलीस हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी बाल न्यायालयाने दिलेली आरोपी मार्टीन सुवारीस (हळदोणा) याची १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
शनिवार
डिचोलीत गव्या रेड्याची बोलेरो गाडीला धडक
कुडचिरे ते डिचोली रस्त्यावर वाठादेत येथे रस्ता ओलांडणाऱ्या गव्या रेड्याची बोलेरो गाडीला धडक बसली. त्यात गाडीचे बरेच नुकसान झाले. गाडीत चालकासह दोघेजण होते.
मांद्रेत नदीपात्रात आढळला मृतदेह
मांद्रे येथे जुनसवाडा पुलाजवळ असलेल्या नदीपात्रात एका पर्यटकाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे.
लक्षवेधी
होंडा नारायण नगर येथे सुक्या लाकडांना आग लागून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने दोन गाड्यांचा वापर करून सुमारे ९० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. दोन तासानंतर आग आटोक्यात आली.
बागा समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित आरोपी सुनील बाबू पवार (२९, रा. चेदनगर झोपडपट्टी, चेंबूर मुंबई, मूळ नांदेड महाराष्ट्र) याला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोवा–कर्नाटक सीमेजवळील पोळे गावात घडलेल्या एका घटनेने हिंसक वळण घेतले. कारवार येथील एका युवकाला दुसऱ्या कारवारच्या रहिवाशाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात पीडित युवकाचे नाक फ्रॅक्चर झाले आहे.
दवर्लीतील मकबूल खान याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणात अटक केलेल्या संशयित राजू तलवार, विपुल पट्टारी, सादिक शेख, दामोदर नाईक, उन्वन देशनूर यांना सबळ पुराव्यांअभावी संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्यात आले.