
मडगाव : दाल्गादो कोकणी अकादमीचा (Dalgado Konknni Akademi) दाल्गादो पुरस्कार २०२५ (Dalgado Award 2025) हा कार्यक्रम मडगाव रवींद्र भवनात ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सहा व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती दाल्गादो कोकणी अकादमीचे अध्यक्ष सेल्सो फर्नांडिस यांनी दिली.
मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फर्नांडिस यांनी दाल्गादो पुरस्कारांची घोषणा केली. फर्नांडिस म्हणाले की, दाल्गादो कोकणी अकादमीकडून कोकणी भाषेसाठी, संस्कृती व वारशासाठी कार्य केले जात आहे. दाल्गादो अकादमीकडून साहित्य, सांस्कृतीक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींचा गौरव केला जातो. दाल्गादो जीवन गौरव पुरस्कार तोमाझिनो कार्दोज, साहित्य पुरस्कार विन्सी क्वाद्रोस, रोमी कोकणी सेवा पुरस्कार आल्फ्रेड जुडास वाझ, सांस्कृतिक पुरस्कार प्लाटिल्डा डायस, फा. फ्रेडी जे. दा कॉस्ता पत्रकारिता पुरस्कार डॅनिअल डिसोझा, जोएल डिसोझा दायज पुरस्कार मिंगुल ब्रागांझा, ब्रेटा मिनेझिस अस्तुरी पुरस्कार संध्या फर्नांडिस यांना प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, रोमी कोकणी लेखक फा. ज्योकीम परेरा उपस्थित असतील.
गेल्या वर्षी राज्य सरकारने जनमत कौल राज्यस्तरावर करण्याचे ठरवले व त्यानुसार कार्यक्रम करण्यात आले. यावर्षीही १६ जानेवारी रोजी दाल्गादो कोकणी अकादमी हा अस्मिताय दिन साजरा करणार आहे. त्यानिमित्त कासावली चर्चच्या सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता कांतारांची सकाळ हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी चार वाजता पणजी येथेही कांतारांची सांज हा कार्यक्रम होईल व त्याठिकाणी कविता सादरीकरण व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी कविता सादरीकरण स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे ते म्हणाले.