
पणजी: झेडपी निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अनेक अंतर्गत आव्हानांचा सामना करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) गोव्यात आपल्या संघटनेची नव्याने बांधणी केली आहे. पक्षाच्या केंद्रीय राजकीय व्यवहार समितीने (PAC) रविवारी, ११ जानेवारी २०२६ रोजी गोव्यासाठी नवीन अधिकृत कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये प्रदीर्घ काळापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले वाल्मिकी नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावून पक्षाने जुन्या आणि विश्वासू नेतृत्वावर भरवसा दर्शवला आहे.
या नवीन कार्यकारिणीत संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. गर्सन गोम्स यांची राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते वाल्मिकी नाईक यांच्यासोबत संघटना वाढवण्यासाठी काम करतील. तसेच, जमिनी स्तरावर पक्षाची पकड अधिक घट्ट करण्यासाठी प्रशांत नाईक यांच्याकडे 'राज्य संघटना सचिव' हे जबाबदारीचे पद सोपवण्यात आले आहे. याशिवाय, ज्येष्ठ नेते संदेश तळेकर देसाई यांना 'राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष' म्हणून बढती देऊन अनुभवी फळीला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.

ही नवीन टीम जाहीर होण्यामागे पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी यांच्या तीन दिवसांच्या गोवा दौऱ्याचा मोठा वाटा आहे. आतिशी यांनी राज्यातील विविध मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला ५० पैकी केवळ एका जागेवर यश मिळवता आले. यांचे गंभीर पडसाद पक्षात उमटले होते. या पराभवानंतर अमित पालेकर, श्रीकृष्ण परब, उपाध्यक्ष चेतन कामत आणि युवा अध्यक्ष रोहन नाईक यांसारख्या नेत्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने पक्षात मोठे नेतृत्व संकट निर्माण झाले होते.
श्रीकृष्ण परब यांनी आपल्या राजीनाम्यात पक्षाच्या अपारदर्शक कार्यपद्धतीवर आणि अमित पालेकर यांना हटवण्याच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ दूर करणे आणि विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे हे नवीन प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. भ्रष्टाचाराचे मुद्दे आणि स्थानिक जनतेच्या समस्यांना वाचा फोडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचा निर्धार नव्या टीमने व्यक्त केला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. संदीप पाठक आणि प्रभारी आतिशी यांनी या बदलांना दिल्लीतून हिरवा कंदील दिला आहे.