गोव्यातील सर्व पंचायतींना ३ वर्षांत मिळणार ‘फायबर इंटरनेट’ची जोडणी

१९१ पंचायतींचे सर्वेक्षण पूर्ण : ‘भारतनेट’ योजना आता निर्णायक टप्प्यावर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th January, 11:44 pm
गोव्यातील सर्व पंचायतींना ३ वर्षांत मिळणार ‘फायबर इंटरनेट’ची जोडणी

पणजी : गोव्यातील ग्रामीण भागाला डिजिटल प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारची ‘भारतनेट’ ही योजना आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. पुढील तीन वर्षांत राज्यातील सर्व १९१ ग्रामपंचायतींना बीएसएनएलच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबर इंटरनेटची हाय-स्पीड जोडणी दिली जाईल, अशी माहिती बीएसएनएलच्या गोवा संचार भवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.राज्यातील १२ तालुक्यांमधील सर्व १९१ पंचायतींचे भौतिक सर्वेक्षण डिसेंबर २०२५ पर्यंत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. सर्व वैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, २०२६ पासून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. टप्प्याटप्प्याने हे काम हाती घेऊन पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी बीएसएनएल सध्या ‘राईट ऑफ वे’ दाखले मिळवण्याकरिता संबंधित विभागांशी संपर्क साधत आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेटसाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रिकल उपकरणे बसवण्याचे कामही तातडीने सुरू केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामीण भागातील डिजिटल दरी मिटणार
सध्या राज्यातील समुद्रकिनारी असलेले भाग किंवा शहरीकरणाच्या मार्गावर असलेल्या अनेक पंचायतींनी खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सकडून इंटरनेट सुविधा घेऊन घरपट्टी, परवाने आणि विविध दाखल्यांचे काम ‘ऑनलाइन’ सुरू केले आहे. मात्र, गोव्याच्या दुर्गम भागातील अनेक पंचायती अजूनही इंटरनेट सुविधेपासून वंचित आहेत. ‘भारतनेट’च्या नवीन सुधारित योजनेमुळे आता या दुर्गम भागातील पंचायतींचे कामकाजही डिजिटल होणार आहे.

हेही वाचा