बर्च दुर्घटना आणि जनआंदोलनांमुळे वातावरण तापण्याची शक्यता

पणजी: गोव्याच्या पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनाला उद्या, सोमवारपासून राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या अभिभाषणाने सुरुवात होत आहे. हे अधिवेशन १६ जानेवारीपर्यंत चालणार असून, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कामकाज सल्लागार समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील. पहिल्या दिवशी प्रामुख्याने राज्यपालांचे अभिभाषण हेच मुख्य कामकाज असणार आहे. अलीकडेच घडलेल्या 'बर्च' दुर्घटनेत २५ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता, या घटनेचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात असणार का, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
राज्यातील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. बर्च दुर्घटनेसोबतच चिंबल येथील युनिटी मॉलविरोधातील आंदोलन आणि तुये येथील रुग्णालयावरून सुरू असलेल्या आंदोलनांचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी बर्च दुर्घटनेवर विशेष चर्चेची मागणी लावून धरली असली, तरी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता असून सभागृहातील वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहेत.
या अधिवेशनात 'वंदे मातरम्' या विषयावरही विशेष चर्चा होणार आहे. विविध प्रकल्पांविरोधात सुरू असलेली जनआंदोलने आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असल्याने, पाच दिवसांच्या या अल्प कालावधीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळू शकतो.