हणजूण कोमुनिदादचा २ लाख चौ.मी. भूखंड हडप

म्हापसा पोलिसांत आसगावातील दाम्पत्यासह इतरांवर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th April, 12:40 am
हणजूण कोमुनिदादचा २ लाख चौ.मी. भूखंड हडप

म्हापसा : हणजूण कोमुनिदादच्या मालकीचा २ लाख चौ. मी. जमिनीचा तात्पुरता ताबा प्रमाणपत्र बनावट करुन या जागेतील २० हजार चौ.मी. भूखंड बनावटगिरीद्वारे विकून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी यशवंत सावंत व मिनाक्षी सावंत (रा. आसगाव) यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

याप्रकरणी कोमुनिदादचे अॅटर्नी सॅबेस्तीयन डिसोझा यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. संशयित आरोपींनी संगनमताने हणजूण कोमुनिदादची सर्व्हे क्रमांक ४९६/१ व ४९६/१-ए मधील २ लाख चौ. मी. जमिनीच्या १९५२ मधील हंगामी ताबा प्रमाणपत्र, सीमांकन कार्यवाही पत्र, आदेश पत्र आणि १९५८ च्या अंतिम ताबा प्रमाणपत्र बनावट करुन त्यावर कोमुनिदादच्या अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी आणि हस्तलिखिताची नक्कल केली. त्यानंतर ही जमीन आपल्या मालकीची असल्याचे संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना भासवले. तसेच २०१९ मध्ये बार्देश उपनिबंधक (सबरजिस्ट्रार) कार्यालयामार्फत या २ लाख जमिनीतील २० हजारपेक्षा जास्त चौ. मीटरचा भूखंड एका परप्रांतीय व्यक्तीला विकला.

हा प्रकार कोमुनिदाद व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास येताच कोमुनिदादने प्रथम न्यायालयात संशयितांविरुद्ध खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे. तसेच हणजूण पोलिसांत तक्रार दिली. हा जमीन विक्री व्यवहार म्हापशातील बार्देश उपनिबंधक कार्यालयात झाल्याचे दिसून आल्यानंतर फिर्यादींनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी सावंत दाम्पत्यासह इतरांविरुद्ध भा.दं.सं.च्या ४१९, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४२० व ३४ कलमान्वये संगनमताने कटकारस्थान रचून हणजूण कोमुनिदादची जमीन हडप केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर हे करीत आहेत.