किर्लपाल येथे कामगारांत झाले होते भांडण
मडगाव : किर्लपाल येथे कामगारांत झालेल्या भांडणावेळी संशयित अजित कुमार केरकेट्टा याने चुलत भाऊ दिलीप केरकेट्टा (२४, रा. तारबोगा सिमदेगा, झारखंड) याला पाईपने मारहाण केली. यात दिलीपचा मृत्यू झाला. याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीवेळी संशयित अजित कुमार केरकट्टा याला सबळ पुराव्याअभावी निर्दोष ठरवले.
झारखंड येथील कामगाराचा खून झाल्याची तक्रार संदीप केरकेट्टा याने नोव्हेंबर २०१९ मध्ये कुडचडे पोलीस ठाण्यात दिली होती. किर्लपाल येथील क्रशरवर काम करणार्या मूळ झारखंड येथील कामगारांत मारामारी झाली व एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संशयित अजित कुमार केरकेट्टा व त्याचा चुलत भाऊ दिलीप केरकेट्टा या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी अजित कुमार केरकेट्टा याने लोखंडी पाईपने दिलीप याला मारहाण केली व त्याला गंभीर जखमी केले. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुडचडे पोलिसांकडून संशयित अजित कुमार केरकेट्टा याच्याविरोधात गुन्हा नोंद करत त्याला अटकही केली. याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुनावणीवेळी संशयित अजित कुमार केरकेट्टा याच्या विरोधात सबळ पुरावा नसल्याने सरकारी पक्ष आरोप सिद्ध करू शकले नाही व न्यायालयाकडून संशयिताला निर्दोष ठरवण्यात आले.