दोन छाप्यांत ३६ जणांना अटक : ४०.९५ लाखांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त
पणजी : सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगवर (आयपीएल) गोव्यात विविध ठिकाणी चालणाऱ्या ऑनलाईन सट्टेबाजीच्या रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने आणि कळंगुट पोलिसांनी मारलेल्या छाप्यांत ३६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४०.९५ लाखांहून अधिक किमतीचे मोबाईल, लॅपटॉप्स आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात आयपीएलवर ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती गोवा पोलिसांच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशल नाईक देसाई आणि लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बांबोळी येथील होली क्राॅसच्या मागे असलेल्या इमारतीत तर नागवा - वेर्णा येथील पंजाब नॅशनल बँकजवळ एका ठिकाणी छापा टाकून ३४ जणांना ४० लाख रुपयांचे १०१ मोबाईल, ११ लॅपटाॅप, ९५ बँक पासबुक, ३५ चेक बूक, १४५ एटीएम कार्ड, ५४ सिम कार्ड व इतर वस्तू जप्त करण्यात आले. या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांविरोधात गोवा सार्वजनिक जुगार कायद्याचे कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई केली. दरम्यान, बांबोळी येथील प्रकरणात अटक केलेल्या ८ जणांना पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी तर नागवा येथील प्रकरणात अटक केलेल्या संशयितांना मडगाव येथे प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी ठोठावली.
कळंगुट पोलिसांची आयपीएल बेटिंगवर कारवाई
कळंगुट पोलिसांनी ८ ते ९ एप्रिल दरम्यान सिकेरी येथे ‘सन अँड सॅन्ड’ अपार्टमेंट येथील एका फ्लॅटवर छापा टाकून दातला फनींद्र वर्मा (३७) आणि वेजंडला साई बाबू (३६) या दोघांना आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १० मोबाईल, १ लॅपटॉप आणि अन्य वस्तू असे मिळून अंदाजे ९५ हजारांचे साहित्य जप्त केले.
ही कारवाई उत्तर गोव्याचे अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक साहिल वायंगणकर आणि त्यांच्या पथकाने केली.