गुन्हेवार्ता : गोव्यात चालणाऱ्या आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांनी उगारला कारवाईचा आसूड

पणजी, कळंगुट, नागवा व वेर्णा परिसरातून ३० पेक्षा अधिक जणांना अटक; लाखोंचे साहित्य जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th April, 05:07 pm
गुन्हेवार्ता : गोव्यात चालणाऱ्या आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांनी उगारला कारवाईचा आसूड

पणजी : सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात विविध ठिकाणी चालणाऱ्या ऑनलाईन सट्टेबाजीच्या रॅकेट्सवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कळंगुट पोलीस व क्राईम ब्रँचने स्वतंत्रपणे केलेल्या छाप्यांत ३० पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली असून, १० लाखांहून अधिक किमतीचे मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कळंगुटमधील कारवाई :

८ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान, कळंगुट पोलिसांनी 'सन अँड सॅन्ड' अपार्टमेंट (सिकेरी) येथील एका फ्लॅटवर छापा टाकून दातला फनींद्र वर्मा (३७) आणि वेजंडला साई बाबू (३६) या दोघांना आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १० मोबाईल फोन्स, १ लॅपटॉप आणि अन्य अ‍ॅक्सेसरीज असे मिळून अंदाजे ९५,०००चे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई उत्तर गोव्याचे अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कळंगुटचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस उपनिरीक्षक साहिल वायंगणकर आणि त्यांच्या पथकाने केली. 

क्राईम ब्रँचची वेर्णा, नागवा व पणजीत धडक कारवाई :

दुसऱ्या प्रकरणात, गोवा क्राईम ब्रँचने वेर्णा, नागवा (सासष्टी) व पणजी येथे समांतर कारवाया राबवत सुमारे ३० जणांना अटक केली. आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळण्याचे व बुकिंग घेण्याचे काम यांच्याद्वारे सुरू होते. यामध्ये वापरले जाणारे मोबाईल्स, लॅपटॉप्स, राउटर्स, नगदी रक्कम आदी सुमारे १० लाखांच्या किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वरील सर्वांवर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.  राज्याच्या विविध भागांमध्ये आयपीएल जुगार रॅकेट सक्रिय असल्याची माहिती गुप्तचर विभागास मिळत असून,पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवायांवर लक्ष ठेवले आहे.