९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पणजी : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा खेळत असलेल्या दोघा आंध्रप्रदेशातील व्यक्तींना कळंगूट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी दातला वर्मा (३७) आणि वेजंदला संबशिवा राव (३६) हे दोघेही आंध्रप्रदेशचे रहिवासी असून, ते सध्या कळंगूट येथे वास्तव्याला होते.
कळंगूट पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून १० मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि एकूण ९५,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी आयपीएलच्या सामन्यांवर विविध मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून सट्टेबाजी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी कळंगूट पोलिसांनी संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आयपीएल हंगामात सट्टेबाज सक्रिय होत असल्याने पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवायांवर लक्ष ठेवले असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.