नाकेरी-बेतुल येथील दुसऱ्या गोदामाची ‘एनओसी’ रद्द

परवानगीनंतर दाखल्यासाठी पुन्हा करता येईल अर्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th April, 12:11 am
नाकेरी-बेतुल येथील दुसऱ्या गोदामाची ‘एनओसी’ रद्द

मडगाव : वेर्णातील ह्युज प्रेसिझन कंपनीच्या नाकेरी बेतूल येथील दुसऱ्या गोदामाला आवश्यक परवानगी नसल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी ना हरकत दाखला मागे घेतला आहे. तसेच परवानगीनंतर दाखल्यासाठी पुन्हा अर्ज करता येईल, असेही आदेशात नमूद आहे.

बेतुल नाकेरी येथील दारुसाठा गोदामातील स्फोटाची घटना घडली. त्यानंतर लोकांनी जिल्हाधिकारी क्लिंटस यांची भेट घेतली होती. लोकांना त्रास न होण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. हा विषय संरक्षण खात्याशी संबंधित असल्याने त्यावर पेसोकडून कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल. स्मरणपत्र पाठवून पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटस यांनी दिले होते. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही परवाना न घेता स्फोटकांचा साठा ठेवल्याबाबत कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल. योग्य परवानगी व सुरक्षात्मक उपाययोजना केल्याशिवाय प्रकल्प सुरू होऊ देणार नसल्याचे सांगितले होते.

आता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी क्लिंटस यांनी कंपनीने आवश्यक परवानगी शिवाय दुसऱ्या गोदामात १५ टन स्फोटकांचा माल ठेवला असल्याने त्या मॅगझीनला दिलेला ना हरकत दाखला मागे घेण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. आवश्यक परवानगीनंतर ना हरकत दाखल्यासाठी पुन्हा अर्ज करता येईल, असेही नमूद आहे.