पीडित महिलांचे बँक खाते हाताळणे म्हणजे वेश्या व्यवसायावर जगणे नव्हे!

उच्च न्यायालयाचे निरीक्षण : केनियन नागरिकाला सशर्त जामीन मंजूर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th April, 11:51 pm
पीडित महिलांचे बँक खाते हाताळणे म्हणजे वेश्या व्यवसायावर जगणे नव्हे!

पणजी : केनियातील युवतींना गोव्यातील हॉटेल व्यवसायात नोकरीचे आमिष दाखवून देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा हणजूण पोलिसांनी २०२३ मध्ये पर्दाफाश केला होता. या प्रकरणातील संशयित न्यूटन मुथुरी किमानी हा पीडित महिलांचे बँक खाते हाताळत होता. तो वेश्या व्यवसायाच्या कमाईवर जगत होता असे होत नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित न्यूटन मुथुरी किमानी या केनियन नागरिकाला सशर्त जामीन मंजूर केला.

एका पीडित केनियन महिलेने ७ सप्टेंबर २०२३ रोजी संशयिताच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. एका बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने तिने हणजूण पोलीस स्थानक गाठले. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यात तिला संशयित विल्किस्टा आचिस्टा हिने केनियातून हॉटेल उद्योगात नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोव्यात आणले होते. त्यासाठी संशयितांनी तिचा प्रवास खर्च केला होता. गोव्यात पोहोचल्यानंतर संशयित मारिया डोर्कास उर्फ इस्त्रालीट हिने पीडित युवतींचे पासपोर्ट ताब्यात घेत तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. तसेच तिला गोव्यासह बंगळुरू परिसरात वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे म्हटले होते. याची दखल घेऊन तत्कालीन हणजूण पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी ८ सप्टेंबर २०२३ रोजी वागातोर मधील एका रिसॉर्टवर छापा टाकून सहा केनियन महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी मारिया डोर्कास उर्फ इस्त्रालीट आणि विल्किस्टा आचिस्टा या केनियन महिला दलालांना अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित दलाल ओल्नपा (नायजेरियन) याला पळण्यासाठी मदत करणाऱ्या चार्ल्स एहून (३२) या नायजेरियन नागरिकास हणजूण पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली होती.

हणजूण पोलिसांनी आणखीन दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी मारिया डोर्कास उर्फ इस्त्रालीट, विल्किस्टा आचिस्टा यांच्यासह न्युटन मुथुरी किमानी आणि रिसॉर्ट चालक विनीता फर्नांडिस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

या प्रकरणी न्युटन मुथुरी किमानी याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. याची सुनावणी घेतली असता, संशयित पीडित महिलांचे बँक खाते तसेच वेश्या व्यवसायातील आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित किमानी याला २५ हजार रुपये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोवा बाहेर जाण्यास व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. याबाबतचा आदेश म्हापसा येथील उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला.

दिल्ली विमानतळावर न्युटनला केली होती अटक

या प्रकरणात आॅनलाईन पद्धतीने क्युआर कोड मार्फत व्यवहार होत असल्याचे तसेच यात हवालामार्फत मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग होत असल्याचे समोर आले. याची दखल घेऊन अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी करून ९ डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावरून केनियात पळून जाणाच्या तयारीत असलेल्या न्युटन मुथुरी किमानी (२४) या केनियन नागरिकाला अटक केली.