संदेश तेलेकर मारहाणप्रकरणी उपनिरीक्षकाची राखीव दलात बदली

उपअधीक्षकांकडून खात्यांतर्गत चौकशी : स्थानिकांची अटकेची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th April, 12:00 am
संदेश तेलेकर मारहाणप्रकरणी उपनिरीक्षकाची राखीव दलात बदली

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना आपचे पदाधिकारी. (संतोष मिरजकर)

मडगाव : संदेश तेलेकर मारहाण प्रकरणात पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन सत्यता पडताळणी केली जाणार आहे. या प्रकरणी अहवाल सादर होईपर्यंत काणकोण पोलीस उपनिरीक्षक राजशेखर रेड्डी यांना राखीव दलात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली आहे.

काणकोण पोलीस उपनिरीक्षकाकडून आपचे नेते संदेश तेलेकर यांना पोलीस ठाण्यात मारहाण केली होती. त्याला निलंबित न करता बडतर्फ करून अटकेची कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांसह आपच्या नेत्यांनी दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत केली.
आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस, वाल्मिकी नाईक व इतर कार्यकर्त्यांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व तेलेकर यांना मारहाण करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक राजशेखर रेड्डी यांना बडतर्फ करून अटक करण्याची मागणी केली.
यावेळी वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना मारहाणीच्या घटनेबाबत रात्री कळवण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा चौकशी पोलीस खात्याकडून करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षकांनी सदर उपनिरीक्षकाची बदली करण्यात येईल, असे सांगितले असता त्याच्याकडून दुसर्‍या ठिकाणीही अशीच मारहाण होऊ शकते. त्यामुळे त्याला बडतर्फ करत चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यावर दोन दिवसांत चौकशी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले.
आमदार व्हेंझी यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांनी घटना घडल्यापासून अजून कोणतीही चौकशी केली नाही. पोलीस उपनिरीक्षक अजूनही सेवेत कार्यरत आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून सदर पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई व्हावी. सर्वसामान्यांवर पोलिसांकडून अत्याचार न होण्यासाठी कारवाई आवश्यक असल्याने बुधवारी पुन्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.
उपनिरीक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी
काणकोण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक चंद्रशेखर रेड्डी यांनी आप नेते संदेश तेले‍कर यांना मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी काणकोणवासीयांनी काणकोण पोलीस स्थानकावर जाऊन पोलीस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांची भेट घेऊन रेड्डी यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली.