कैरी... हे नाव वाचताच तोंडाला पाणी सुटते? हिरव्यागार कैऱ्या सध्या उपलब्ध आहेत. झाडावरून कैरी काढून ती फोडून मीठ व मिरचीपूड भुरभुरून खाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. कैरीचे गुण, फायदे व कैरी खाण्याचे परिणाम आपल्या आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहेत, ते आज समजून घेऊया.
आंबट कैरी जिभेची रुची वाढवते. म्हणजेच आपल्याला कधी कधी जेवावंसं वाटत नाही, तोंडाला चव नाही असे वाटते. अशा वेळी खारातली कैरी, किंवा कैरीचे लोणचे दिसले की लगेच जेवायची इच्छा होते. कोणताही आजार होऊन गेला की जिभेची चव जाते, तेव्हा आपल्याकडे गोव्यात उकड्या तांदळाची पेज आणि तोंडी लावायला खारातली कैरी (तॉराची शीर किंवा आमली) दिली जाते आणि ही कैरीची फोड खाल्ली की तोंडाला चव येते आणि हळूहळू ताकद सुद्धा सुधारते. रुची वाढवण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे बनवले जातात, जसे की कैरीचे गोड लोणचे, तिखट लोणचे, खळातले तॉर, आमली, कैरीची चटणी, साखरांबा, छुंदा, आमचूर इत्यादी. हे सर्व पदार्थ मात्र कमी प्रमाणात फक्त तोंडी लावण्यासाठी खावे. मेथीदाणे, गूळ घालून कैरीची आमटी (तॉरांचॉ रोस) गरम भाताबरोबर रुचकर लागते.
उकाडा व थकवा कमी करण्यासाठी कैरीचे पन्हे म्हणजेच कैरी उकडून तयार केलेले सरबत उपयोगी आहे. हे आंबट-गोड सरबत घरी तयार करता येते. पन्हे प्यायल्याने तरतरी येते आणि जिभेची चवसुद्धा वाढते. उन्हाळ्याच्या सुरुवातीस जेव्हा कैरी येते तेव्हा ती खाण्याचा मोह आवरत नाही. पण ही कैरी जास्त प्रमाणात खाल्ली तर शरीराला त्रास होऊ शकतो. जास्त प्रमाणात कैरी खाल्ल्याने वात, पित्त, कफ हे आपल्या शरीरातील तीनही दोष असंतुलित होऊ शकतात. शरीरातील रक्त सुद्धा कच्ची कैरी जास्त खाल्ल्याने दूषित होते आणि त्यामुळे अनेक त्वचाविकार होऊ शकतात.
कैरी आंबट असल्याने जास्त प्रमाणात खाल्ली असता, घसा खवखवणे, सर्दी, खोकला, पित्त वाढून ऍसिडिटी होणे, चेहऱ्यावर मुरमे येणे, घामोळे येणे यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे थोड्या प्रमाणातच कैरीचे पदार्थ खावे. कैरीचे वेगवेगळे पदार्थ उन्हाळ्यात नक्की खाऊन बघा. पण हो, अतिप्रमाणात व रोज रोज सेवन करण्याचा मोह मात्र टाळा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य