जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी : म्युटेशन कामासाठी लाच घेतल्याच्या प्रकरणात दोषी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : म्युटेशन संदर्भातील कामासाठी सात हजारांची लाख घेताना सासष्टीतील सारझोराचे तत्कालीन तलाठी जेरी फर्नांडिस याला २०१४ मध्ये दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी शिस्तपालन समितीच्या चौकशीत तलाठी जेरी फर्नांडिस दोषी आढळल्यामुळे त्याला सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी जारी केला आहे.
या प्रकरणी सारझोरा येथील अविनाश डायस यांनी एसीबीकडे २०१४ मध्ये तलाठी जेरी फर्नांडिस याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात डायस यांच्या सारझोरा येथील सर्व्हे क्रमांक १०९/६ बी मालमत्ता म्युटेशन प्रक्रिया लवकर करण्यासाठी तत्कालीन तलाठी जेरी फर्नांडिस याने दहा हजार रुपयांची लाच मागल्याची तक्रार एसीबीकडे दाखल केली होती. दहा हजारांची रक्कम कमी करून सात हजार रुपये देण्याचे ठरले. नुवे येथे तक्रारदार अविनाश डायस यांच्याकडून ही रक्कम घेताना तलाठी जेरी फर्नांडिस याला एसीबीने २७ जून २०१४ रोजी रंगेहाथ पकडून अटक केली होती. एसीबीने फर्नांडिस आणि तक्रारदार यांच्यातील लाचेची मागणी करत असतानाचे संभाषण तपासणीसाठी चंदिगड व हैदराबाद येथील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यांचा अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर एसीबीने तपास पूर्ण करून जेरी फर्नांडिस याच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
शिस्तपालन समितीच्या चौकशीत आरोप सिद्ध
लाच घेतल्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर फर्नांडिसला दक्षता खात्याने निलंबित केले होते. निलंबन १८ सप्टेंबर २०१८ रोजी मागे घेण्यात आले. केपेतील तत्कालीन संयुक्त मामलेदार रमेश गावकर यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने चौकशी सुरू केली होती. या समितीने केलेल्या चौकशीत फर्नांडिस यांच्यावरील आरोप सिद्ध झाले. याची दखल घेऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी जेरी फर्नांडिस याला सक्तीची निवृत्ती देण्याचा आदेश जारी केला आहे.