विधानसभा निवडणुकीत ५२ टक्के मते, २७ पेक्षा अधिक जागांचे ध्येय

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक : उत्तर गोवा सक्रिय कार्यकर्ता संमेलन उत्साहात


09th April, 11:28 pm
विधानसभा निवडणुकीत ५२ टक्के मते, २७ पेक्षा अधिक जागांचे ध्येय

उत्तर गोवा सक्रिय कार्यकर्ता संमेलनाला उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार दयानंद सोपटे व कार्यकर्ते.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ५२ टक्क्यांपेक्षा अधिक मते आणि २७ पेक्षा अधिक जागा मिळवायाच्या आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले. बुधवारी पणजीत उत्तर गोवा सक्रिय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री व आमदार उपस्थित होते.
दामू नाईक म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोलण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी मला ‘गोव्यात पुढे काय’, अशी विचारणा केली. त्यांना मी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी आणि जागा वाढवण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. भाजपला ३३.३६ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांच्या पुढे मते घ्यायची असतील तर कार्यकर्त्यांनी कामाला लागणे आवश्यक आहे. गुजरातने मतांची टक्केवारी वाढवून दाखवली आहे. आता आपणही असे करून दाखवूया.
ते म्हणाले, आपल्याला ५२ टक्के मते हवी असतील तर चाळीससही मतदारसंघांत निवडणूक लढवावी लागेल. यासाठी मला सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांची साथ हवी आहे. २०२७ मध्ये २७ पेक्षा अधिक जागा जिंकायच्या असतील तर जुन्या, जाणत्या सर्वांना घेऊन पुढे जावे लागेल. सोडून गेलेला प्रत्येक कार्यकर्ता हा मूळचा पक्षाचाच आहे हे लक्षात घ्यावे लागेल. पक्षात शिस्तीला महत्त्व आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांनी घालून दिलेल्या शिस्तीच्या मार्गावरच पक्ष चालणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारने केलेली विकासकामे, योजना, निर्माण केलेल्या साधनसुविधा जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आतापासून काम सुरू केल्यास २०२७ मध्ये २७ पेक्षा अधिक जागा मिळवणे सहज शक्य आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नकारात्मक गोष्टी बोलण्यापेक्षा सरकारच्या सकारात्मक गोष्टी जनतेपर्यंत पोहोचावा.
समाजमध्यामांवर सक्रिय राहा !
भाजप कार्यकर्त्यांनी जनतेत मिसळण्यासोबतच समाजमाध्यमांवर सक्रिय राहणे आवश्यक आहे. सरकारची विकासकामे समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. समाज माध्यमातील नकारात्मक टीकेला योग्य पद्धतीने उत्तर दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.