उसगाव, मडकई येथे झाला होता अपघात
उसगाव येथे झालेल्या अपघातातील अपघातग्रस्त वाहने.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : उसगाव आणि मडकई येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांचा मंगळवारी सकाळी गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उसगावात सोमवारी सायंकाळी कारची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली होती. मडकईत ३० मार्च रोजी दुचाकीचा स्वयंअपघात झाला होता.
सोमवारी सायंकाळी उसगाव गांजे येथे कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर टक्कर झाली होती. कार उसगावहून वाळपईला निघाली होती, तर दुचाकी वाळपईहून उसगावला येत होती. या अपघातात आशिष अशोक नायक (२५, तिराल-उसगाव) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेतून प्रथम पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला बांबोळीतील गोमेकॉत पाठवण्यात आले. गोमेकॉत उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले.
अदानवाडा मडकई येथे ३० मार्च रोजी दुचाकीचा स्वयंअपघात झाला होता. दुचाकीवरील दोघे मडकईहून टोंकला जात होते. या अपघातात दुचाकी चालक वासिम (४२, नागझर-कुर्टी) आणि पाठीमागे बसलेला मुस्तफा आलन हे दोघेही जखमी झाले होते. त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी वासिम यांचा उपचार सुुरू असतानाच गोमेकॉत मृत्यू झाला.