दहावी परीक्षेत गणित, विज्ञान ठरले कठीण विषय

संस्कृतचा निकाल १०० टक्के : सामाजिक शास्त्रमध्ये ४५ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण


08th April, 11:51 pm
दहावी परीक्षेत गणित, विज्ञान ठरले कठीण विषय

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल २.९७ टक्क्यांनी अधिक लागला आहे. विविध विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. असे असले तरी यंदा दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना गणित (मूलभूत), विज्ञान, खगोलशास्त्र आणि सामाजिक शास्त्र हे विषय अन्य विषयांच्या तुलनेत जरा कठीण गेले आहेत. या चार विषयांत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मंडळाने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
यंदा गणित (मूलभूत) विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे ९५.१५ टक्के आहे. यानंतर विज्ञान विषयात ९६.८७ टक्के, खगोलशास्त्रात ९६.९७ टक्के, तर सामजिक शास्त्र विषय घेतलेले ९७.०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भाषा विभागात इंग्रजी विषय (प्रथम भाषा) तुलनेने अवघड ठरला आहे. यंदा ९८.२२ टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर हिंदी (९९.४७ टक्के), कोकणी (९९.५५ टक्के), पोर्तुगीज (९९.६४ टक्के) आणि मराठी (९९.६६ टक्के) यांचा क्रमांक लागतो. उर्दू, संस्कृत, अरेबिक, फ्रेंच या विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
अवघड गेलेल्या विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील अधिक आहे. गणित (नियमित), गणित (मूलभूत), विज्ञान, सामाजिक शास्त्र, खगोलशास्त्र, फाईन आर्टस् या विषयात एकूण ११५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. यातील सर्वाधिक ४५ विद्यार्थी सामाजिक शास्त्र विषयातील आहेत. विज्ञानात २९, तर खगोलशास्त्रमधील २६ जणांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. भाषा विभागात इंग्रजीमध्ये एका विद्यार्थ्याने १०० पैकी सर्वाधिक ९७ गुण मिळवले. कोकणीमध्ये एका विद्यार्थ्याने १०० पैकी सर्वाधिक ९८ गुण मिळवले. मराठीमध्ये २ विद्यार्थ्यांनी १०० पैकी सर्वाधिक ९८ गुण मिळवले.
अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत मंडळाने नव्याने सुरू केलेल्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारत आहे. यामध्ये २०२१-२२ मध्ये सुरू केलेले गणित (नियमित), गणित (मूलभूत) आणि खगोलशास्त्र, २०२२-२३ मध्ये सुरू केलेला फाईन आर्टस् व २०२४-२५ मध्ये सुरू केलेला आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यांचा समावेश आहे. मंडळाने सातवा विषय म्हणून निवडण्यासाठी २० पर्यायी विषय दिले होते. यंदा ८,८०२ विद्यार्थ्यांनी सातवा विषय घेतला होता. यातील ८,७१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९९.०३ इतकी असल्याचे अहवालात म्हटले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी अव्वल
अहवालानुसार, यंदा अन्य तालुक्यांच्या तुलनेत राज्यातील ग्रामीण भागातील तालुक्यांतील निकाल अधिक लागला आहे. डिचोली तालुक्यातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच ९८.५० होती. पेडणेतील ९७.८५ टक्के, सत्तरीतील ९७.७३ टक्के, तर काणकोणमधील ९५.९० टक्के राहिली. मुरगाव तालुक्यातील निकाल सर्वांत कमी म्हणजेच ९२.९७ टक्के लागला. विद्यार्थीनिहाय पाहता सासष्टी तालुक्यातून सर्वाधिक ३,८८० जणांनी परीक्षा दिली होती, यातील ३,६७१ उत्तीर्ण झाले (९४.६१ टक्के).