मूल्यांकनाची पद्धत जाहीर : कौशल्यविकास विषयाची लेखी परीक्षा असेल ४० गुणांची
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) कार्यवाहीनंतर आता शालान्त मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ‘ग्रेस मार्क’ असणार नाहीत. ग्रेस मार्कऐवजी कॉम्पेन्सेशन (गुण भरपाई) योजना लागू केली जाणार आहे. ‘नीड्स इम्प्रूव्हमेंट’ असा शेरा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पेन्सेशन योजना लागू होईल. परीक्षेचे विषय, पेपरचे गुण आणि मूल्यांंकन पद्धतीविषयीचे परिपत्रक शालान्त मंडळाने प्रसिद्ध केले आहे.
इयत्ता नववीनंतर यंदापासून (२०२५-२६) दहावी इयत्तेला राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होणार आहे. परीक्षेचे पेपर तसेच मूल्यांकन पद्धतीविषयीचे परिपत्रक शालान्त मंडळाने विद्यालयांना पाठवले आहे. दहावीसाठी ६ शैक्षणिक (स्कोलेस्टीक) आणि ४ कौशल्यविकास (स्कील बेस्ड) विषय असतील. तीन भाषा (इंग्लीश, मराठी/कोकणी आणि एक भाषा) समाजशास्त्र, विज्ञान आणि गणित असे सहा विषय शैक्षणिक असतील. विज्ञानाचा पेपर ७० गुणांचा असेल, इतर पाच विषयांचे पेपर प्रत्येकी ८० गुणांचे असतील. विज्ञानाला १० अंतर्गत आणि २० प्रात्यक्षिक पेपरचे गुण असतील. अन्य पाच विषयांसाठी २० अंतर्गत गुण असतील. लेखी पेपर ३ तासांचा असेल.
इंटरडिसिप्लिनरी एरिया, व्होकेशनल (एनएसक्यूएफ), कला आणि शारीरिक शिक्षण हे चार विषय कौशल्यावर (स्कील बेस्ड) आधारित असतील. या चारही विषयांचे लेखी पेपर ४० गुणांचे असतील. पेपर सोडवण्यासाठी २ तास दिले जातील. या चार विषयांसाठी अंतर्गत गुण ६० असतील. सर्व दहा विषयांचे (लेखी, अंतर्गत, प्रात्यक्षिक) एकूण गुण पूर्वीप्रमाणेच १०० असतील.
कॉम्पेन्सेशन योजनेचे निकष
‘नीड्स इम्प्रूव्हमेंट’ शेरा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असेल.
एक वा दोन शैक्षणिक विषयांत ‘एच’ किंवा ‘आय’ ग्रेड मिळाला असेल तर या विषयांत त्यांच्या ग्रेडमध्ये सुधारणा होईल.
मात्र त्यासाठी दोन कौशल्यविकास विषयात कमीतकमी ६५ टक्के गुण आवश्यक आहेत.
अन्य दोन कौशल्यविकास विषयांत ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
क्रीडा गुण योजना
कॉम्पेन्सेशन योजना दोन शैक्षणिक विषयांतील ग्रेडमध्ये सुधारणा करण्यासाठी आहे.
विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तर कॉम्पेन्सेशन योजनेसह क्रीडा गुणांचा लाभ मिळू शकतो.
उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष
लेखी परीक्षेला कमीतकमी ‘एच’ श्रेणी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत स्वतंत्र ‘एच’ श्रेणी मिळणे आवश्यक.
लेखी आणि अंतर्गत गुण मिळून विषयात ‘ए’ ते ‘जी’पर्यंतची ग्रेड मिळणे आवश्यक.
कंडोनेशन वा ग्रेस मार्क देण्याची तरतूद नाही.
एटीकेटी धोरण
एक वा दोन विषयांत ‘नीड्स इम्प्रूव्हमेंट’ शेरा असलेल्या विद्यार्थ्यांना/उमेदवारांना एटीकेटीचा लाभ मिळेल.
अकरावीच्या वर्गात बसण्यासह परीक्षा देता येईल.
दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतरच अकरावीचा निकाल जाहीर केला जाईल.
पुरवणी परीक्षा
एटीकेटी वा ‘नीड्स इम्प्रूव्हमेंट’ शाखेतील विद्यार्थी पुरवणी परीक्षेला पात्र ठरतील.
परीक्षेला न बसलेले विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसू शकतात.
सुधारणा योजनेखाली निकालात सुधारणा करणारे विद्यार्थी पुरवणी परीक्षेला पात्र ठरतील.