तीन उदमांजरे, दोन रानमांजरांचा मृत्यू झाल्याने बोंडला प्राणीसंग्रहालय बंद

संसर्गजन्य आजाराचा संशय : अधिकाऱ्यांकडून दररोज स्थितीचा आढावा


09th April, 11:31 pm
तीन उदमांजरे, दोन रानमांजरांचा मृत्यू झाल्याने बोंडला प्राणीसंग्रहालय बंद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : संसर्गजन्य आजारामुळे तीन उदमांजरे (सीवेट कॅट) आणि दोन रानमांजरांचा (वाईल्ड कॅट) मृत्यू झाल्याने बोंडला प्राणीसंग्रहालय जनतेसाठी बंद ठेवले आहे. संसर्गजन्य रोग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय वन खात्याने घेतला आहे. प्राण्यांचे डॉक्टर आणि वन खात्याचे अधिकारी दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहेत. संसर्गजन्य आजाराचे जंतू नष्ट झाल्यानंतर प्राणीसंग्रहालय खुले केले जाईल, अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उदमांजर


रानमांजर

मृत्यू पावलेल्या प्राण्यांच्या मृतदेहातील काही नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर जंतू (विषाणू) आणि आजाराविषयीची स्पष्टता येईल. जंतू कसा तयार झाला, लागण कशी झाली, या विषयीचे कारण वन खात्याच्या लक्षात आलेले नाही. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच आजाराचे कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. रानमांजरांचा मृत्यू झाल्यानंतर १ एप्रिलपासून प्राणीसंग्रहालय बंद आहे. प्राणीसंग्रहालयाच्या परिघात विषाणू नसल्याची खात्री झाल्यानंतरच प्राणीसंग्रहालय खुले केले जाईल. त्याला आणखी काही दिवस लागतील, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
स्थिती सुधारल्यानंतरच प्राणीसंग्रहालय होणार खुले
यापूर्वीही बोंडला अभयारण्याच्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचा मृत्यू झाला होता. वय झाल्यानंतर काही प्राण्यांचा मृत्यू होतो. नियमितपणे प्राण्यांची आरोग्य तपासणी केेली जाते. मात्र काही आजारांवर उपाय होत नाहीत. रानमांजरांच्या मृत्यूमुळे प्राणीसंग्रहालय बंद ठेवल्याविषयीची माहिती सरकारला कळवली होती. बोंडला प्राणीसंग्रहालयातील वातावरण तसेच जंतूच्या संसर्गाविषयीचा आढावा दररोज घेतला जात आहे. स्थिती सुधारल्यानंतर प्रथम प्राणीसंग्रहालय खुले केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार : वनमंत्री
दरम्यान, प्राणीसंग्रहालय बंद ठेवल्याविषयीची माहिती सरकारला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. बोंडला प्राणीसंग्रहालयाच्या स्थितीचा आढावा बैठकीत घेतला जाईल, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.