आरोग्य वार्ता : भारतात दररोज होतो सरासरी ५२ गरोदर महिलांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्र संघाचा धक्कादायक अहवाल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th April, 11:34 am
आरोग्य वार्ता : भारतात दररोज होतो सरासरी ५२ गरोदर महिलांचा मृत्यू

मुंबई : गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान महिलांचा मृत्यू अजूनही भारतासह अनेक देशांमध्ये गंभीर समस्या आहे. यासंदर्भातील एक धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यानुसार भारतामध्ये २०२३ साली तब्बल १९,००० गरोदर महिलांचा मृत्यू झाला आहे, म्हणजेच दररोज सरासरी ५२ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारत दुसऱ्या क्रमांकावर : पाकिस्तानपेक्षा अधिक मृत्यू

या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, गर्भधारणा व प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारताचा क्रमांक नायजेरियानंतर दुसरा आहे. नायजेरियामध्ये २०२३ मध्ये ७५,००० महिलांचा मृत्यू झाला. पाकिस्तानमध्ये मात्र याच काळात ११,००० मृत्यू नोंदवले गेले. जगभरातील ४७टक्के गर्भवती महिलांचे मृत्यू फक्त खालील चार देशांमध्ये झाले आहेत

 

२३ वर्षांत ७८ टक्क्यांची घट, पण...

भारतामध्ये २००० ते २०२३ दरम्यान मातृ मृत्यूदरात लक्षणीय ७८ टक्के घट झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या घटेसाठी वैद्यकीय सेवा, आरोग्य यंत्रणा आणि जनजागृतीतील वाढ कारणीभूत आहे. मात्र, २०१६ नंतर सुधारणा मंदावल्या आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.

डब्ल्यूएचओचा इशारा

जगभरातील गर्भवती महिलांसाठी अजूनही परिस्थिती गंभीर आहे. जर हेल्थ केअर प्रणालीत वेगाने सुधारणा केल्या गेल्या नाहीत, तर ही समस्या अधिक वाढू शकते, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी यावर चिंता व्यक्त करत म्हटले आहे.

गरज आहे ठोस उपायांची

* ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत करणे
* प्रत्येक महिलेला दर्जेदार प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची सेवा देणे
* पोषण, रक्तस्त्राव, संसर्ग यावरील तात्काळ उपचार
* प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक
* जनजागृतीसाठी विशेष मोहिमा

ही आकडेवारी चिंताजनक असली तरी भारताच्या आरोग्य क्षेत्रात गेल्या दोन दशकांत झालेल्या सुधारणांमुळे काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रभावी उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

हेही वाचा