राज्यात दिवसाला सरासरी २१ लिटर रक्तदान

पाच रक्तपेढ्या कार्यरत : दात्यांनी घेतला नाही कोणताही मोबदला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th April, 12:11 am
राज्यात दिवसाला सरासरी २१ लिटर रक्तदान

पणजी : राज्यात २०१९ ते २०२४ दरम्यान विविध खासगी आणि सरकारी रक्तपेढीद्वारे संकलित करण्यात आलेल्या एकूण रक्तापैकी १.०५ लाख युनिट म्हणजेच ४७ हजार ५४९ लिटर रक्त हे दान करण्यात आले होते. याचाच अर्थ दिवसाला सरासरी २१.७२ लिटर रक्तदान करण्यात आले आहे. यासाठी दात्यांनी कोणताही मोबदला घेतला नव्हता. आर्थिक सर्व्हेक्षण २०२४-२५ मधून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार राज्यात एकूण ५ रक्तपेढच्या कार्यरत आहेत. यातील ३ सरकारी तर २ खासगी आहेत. वरील कालावधीत रक्तदान व बदली पद्धतीने एकूण १ लाख ५० हजार २३५ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. एक युनिट मध्ये ४५० मिलिमीटर रक्त असते. वरील कालावधीत एकूण ६७ हजार ६०५ लिटर रक्त संकलन झाले. याचाच अर्थ वर्षाला सरासरी ११ हजार २२७ लिटर, महिन्याला ९३९ लिटर तर दिवसाला सरासरी ३०.७५ लिटर रक्त संकलन करण्यात आले आहे.
रक्तदानाची टक्केवारी ९० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न
आपत्कालीन परिस्थितीत रक्त कमी पडू नये, यासाठी रक्त संकलन करण्याचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. एकूण रक्त संकलनापैकी मोफत दान करण्यात रक्ताची टक्केवारी ७०.३३ इतकी होती. सरकार ही टक्केवारी ९० पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. याद्वारे बदली रक्त उपलब्ध करून देण्याची पद्धत टप्प्यात बंद करण्याचा प्रयत्न आहे. वरील कालावधीत २०२४ मध्ये सर्वाधिक १० हजार लिटर रक्तदान करण्यात आले होते. तर २०२३ मध्ये ९५५६ लिटर रक्तदान करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
२०१९ पासून झालेले रक्तदान
वर्ष                रक्तदान (लिटरमध्ये)

२०१९              ७,५८४
२०२०              ५,३२८
२०२१              ६,८६८
२०२२              ८०२६
२०२३              ९५५६
२०२४              १०,०००