बेळगावच्या एका साध्या खानावळीची आणि तिथल्या अन्नपूर्णा असलेल्या कमलाक्काची ही कहाणी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभी राहिलेली कमलाक्का आणि तिच्या खानावळीतील मायेचा ओलावा या लेखात दिसून येतो.
हल्लीच एका काव्यमैफिलीसाठी बेळगावला गेले होते. पूर्वी तसे बऱ्याचदा जाणे होत असे. नातेवाईक म्हणा, कार्यक्रम म्हणा. तसा मराठी भाषिक हा प्रांत. त्यामुळे साहित्यविषयक घडामोडी होतच असतात बेळगावात. संध्याकाळी पोहोचलो आम्ही त्या दिवशी. संध्याकाळी यजमानाकडेच जेवणाचा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम, मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी गोवा परत. असा बेत होता. आणि आता बेळगावात आल्यानंतर कमलाक्काच्या जेवणाची चव चाखली नाही तर कसे होणार माझे! एक रिवाजच होता माझा तो. कमलाक्काची खानावळ तशी साधी म्हणा, हवे तर, पण शहराच्या अगदी मध्यभागी. सरकारी ऑफिस, बाजार यांनी वेढलेला परिसर तो. जेवण पूर्णपणे शाकाहारी. ताज्या भाज्या त्या बेळगावच्या, शिवाय विहिरीचे पाणी. साधे जेवण जरी असले तरी चवच बदलते, तसे काही झाले होते कमलाक्काच्या खानावळीचे. दुपारी बारा ते तीन पर्यंत प्रचंड गर्दी. कमलाक्काला बोलायला फुरसत नसे. कोणाला चपाती, कोणाला भाजी तर कोणाला काय, नुसती गडबड. पण ही एकटी बाई खंबीरपणे सगळे सांभाळी. अनुभवाने ग्राहकांची पसंती लगेच कळायची तिला. तसेच ती वागायची समोरच्याकडे.
माझी आणि कमलाक्काची ओळख जवळजवळ वीस वर्षांची. माझी मैत्रीण एकदा मला घेऊन गेली संध्याकाळी. चाळवजा जागा. समोरच्या दोन खोल्यांत जेवणावळ आणि आत किचन, मग कोठी. साधारण रंग, वर कौलारू छत असा थाट होता सगळा. जेवण पाटावर बसून जेवायचे हा नियम. नो टेबल, नो खुर्ची. हॉटेलात जाणारी मी अशी खानावळ बघून नाक मुरडतच जेवायला बसले.
पाच मिनिटांनी एक मध्यमवयीन स्त्री ताटे घेऊन आली. नऊवारी लुगडे, कर्नाटकी पद्धतीचे, सतत चुलीकडे राहून रापलेला गौर वर्ण, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि गळ्यात माळ. कमलाक्काची प्रथम ओळख तिथेच झाली. जेवण साधे जरी असले तरी चविष्ट. खरेच जादू होती तिच्या हातात. प्रथमदर्शनी नाक मुरडलेली मी पोळी खाल्ल्यानंतर जेवणावर तुटून पडले. कित्येक दिवसांनी रात्रीचे नियम मोडून भरपूर जेवले मी. तेसुद्धा शाकाहारी. आणि तिथून झाली एका वारीला आणि मैत्रीला सुरुवात. वारी म्हणजे बेळगावला गेल्यावर नेमाने आणि हक्काने कमलाक्काच्या खानावळीत जेवायचे. आणि मैत्री म्हणजे पहिल्या भेटीतच ही अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न झाली. मालक व गिऱ्हाईकापेक्षा एक वेगळे नाते जुळले. आम्हा दोघींत.
तसे कमलाक्काला फारसे कोणी नव्हते आपले म्हणायला, आणि तशीच ती फारशी कधीच बोलत नसे स्वतःबद्दल. पण का कोणास ठाऊक माझ्यावर तिला खूप विश्वास होता. कधी गेले की बसवून घेई मला. गिऱ्हाईक कमी झाली की मग बसत असू आम्ही शिळोप्याच्या गप्पांना. तशी कमलाक्का शेतकरी कानडी मराठी परिवारातील मोठी कन्या. म्हणून आक्का. १५ व्या वर्षी लग्न होऊन सासरी आली ती, बाकी काही नाही पण हे कमलाक्का नावाचा वारसा घेऊन. नवरा ड्रायव्हर होता पण दारू पीत असे. आता ज्या ठिकाणी खानावळ होती त्याच ठिकाणी एका छोट्या खोलीत संसार होता. अर्थात दारूमुळे घरात पैसा टिकत नव्हता. कधी कधी अन्नाचा कणही नसे. एक मुलगा पदरात होता. खूप हाल सोसले कमलाक्काने. त्यातच एक दिवस अपघातात नवरा गेला. उघड्यावर पडली कमलाक्का. पदरी पोर, त्यात सासर, माहेरचा काहीच सपोर्ट नव्हता. अक्षरश: भीक मागायची पाळी आली. पण बाई तशी खमकी. आयुष्यात चढउतार पाहिलेली, हरली नाही. ओळखीने एका खानावळीत काम करू लागली. आणि मग सुरू झाला एक यज्ञ अन्नपूर्णेचा. संध्याकाळी खानावळीतून घरी आल्यावर एक, दोन डबे करून द्यायची. हळूहळू डबे वाढू लागले. आणि मग जन्म झाला आजच्या खानावळीचा.
जेवणाची एक गंमत असते बघा, जेवणाऱ्यापेक्षा जेवण बनवणारा ते किती प्रेमाने आणि आपलेपणाने करतो त्यावर त्यांची चव ठरते. जेवण करणाऱ्याची आत्मीयता जणू काही त्या भाजीत, रस्स्यात उतरते. कमलाक्काचे अगदी तसेच. साधी डाळ का होईना पण करेल ते जीव ओतून. घरात एकेकाळी दुर्दैवाचे दशावतार पाहिलेली ती, खानावळ चालू करताना अनेक अडचणींचा सामना करणारी, विधवेच्या नशिबात येणाऱ्या वाईट नजरांचा विखार कमी करण्यासाठी ठसठशीत कुंकू लावणारी कमलाक्का खरोखरीच धैर्याचा महामेरू म्हणा हवे तर.
कित्येक लोक आज हक्काने येतात जेवायला. अर्थात आता पाट जाऊन टेबल आली, पंखा आला पण चव मात्र बदलली नाही. आजही प्रत्येक गिऱ्हाईकाला काय हवे नको ते बघून भरपूर आग्रह करणारी कमलाक्का आज अनेक जणांची आक्का बनली आहे. बेळगाव तशी व्यापारी पेठ तशीच शिक्षणाचे आगर. अनेक विद्यार्थी येतात आक्काकडे जेवायला. अनुभवातून माणसांची पारख योग्य करायला शिकलेल्या कमलाक्काला नवीन गिऱ्हाईक कसे आहे याचा अंदाज लगेच येतो. खोटे बोलून, सहानुभूती घेऊन पैसे चुकवायला बघणाऱ्यांना एका फटक्यात सरळ करणारी आक्का विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र खूपच सौम्य असते. आज तिचा मुलगा धंद्यात मदत करतोच पण परिस्थितीमुळे त्याच्या शिक्षणाची झालेली आबाळ ती विसरली नाही. ती वेळ दुसऱ्यावर येऊ नये असे तिला सतत वाटत असते. कोणालाही माहीत नाही की ती खानापुरात एका संस्थेला गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या कमाईचा ठराविक हिस्सा देते नेहमी. अर्थात हे जुळवून आणण्यात माझा खारीचा वाटा आहे म्हणून मला माहीत.
आजही हा अन्नपूर्णेचा यज्ञ चालूच आहे. आक्का थकलीय आता पण तिचा मुलगा व सून सांभाळतात आक्काचे व्रत खंबीरपणे. आणि साथ आहे त्यांना आक्काची......
- रेशम जयंत झारापकर, मडगाव