हिरा कोंदणात शोभतो...

'हिरा कोंदणात शोभतो' या उक्तीतून मानवी जीवनातील विविध 'कोंदणां' चे महत्त्व सांगितले आहे. नयनांच्या कोंदणापासून ते बुद्धी आणि संस्कारांच्या कोंदणापर्यंतचा हा विचारप्रवर्तक लेख आहे.

Story: मनातलं |
04th April, 10:17 pm
हिरा कोंदणात शोभतो...

एका जुन्या मराठी चित्रपट गीतात प्रभातकाळचे वर्णन केले आहे, ‘माझिया नयनांच्या कोंदणी, उमलते शुक्राची चांदणी !! तम विरते रात्र सरते, पहाट वारे झुळझुळते!!’ इथे नयनांना कोंदणाची उपमा दिली आहे. ते कोंदण असं की ज्यामध्ये शुक्राच्या चांदीचे बिंब उमटताना दिसते. म्हणजे ती रत्नजडित हिऱ्याप्रमाणे शोभिवंत दिसते. खरोखरीच कवी मनाची ही किती सुंदर कल्पना आहे, नयनरूपी कोंदणात आपण आपल्याला अनमोल वाटणाऱ्या व्यक्तीच्या प्रीतीचे रूप साठवून ठेवत असतो. जसं भक्ताच्या नयनात देवाचे रूप साठवलेले असते. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. असं ते सुखमय दर्शन नजरेच्या कोंदणात जडवून ठेवता येतं. ही कल्पनाच किती सुंदर आहे ना. त्यासाठी कवी मनच हवं. एरव्ही कोंदण हा शब्द सोनाराने घडवलेल्या दागिन्यांसाठी वापरला जातो. अलंकारावर रत्ने बसविण्यासाठी केलेले घर किंवा बैठक याला कोंदण असे म्हणतात.

कोंदण म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी वस्तू आठवण म्हणून ठेवली जाते, त्या वस्तूला आपल्याशिवाय दुसरे कुणी दूर करू शकणार नाही. कुणी परमेश्वराला, कुणी प्रियतम व्यक्तीला मनाच्या कोंदणात जपून ठेवतात. ते स्थान अढळ आणि निढळ असतं, मनाचं कोंदण हे जपणूक करणारं असतंच शिवाय पूजनीय स्थान असतं.

एखाद्या खूप हुशार, बुद्धिमान असलेल्या विद्यार्थ्याला आजूबाजूची परिस्थिती, त्याचे पालक, त्याचे शिक्षक, त्याची पूर्ण सपोर्ट सिस्टीम जर चांगली लाभली तर त्याची वाढ होऊन तो पुढे कुणी तरी विद्यमान व्यक्ती घडू शकतो. सर्वांचे सहाय्य मिळून त्याच्यावरची पकड घट्ट असेल, आधार मजबूत असेल तर त्याची प्रगती होत जाते, तो हिऱ्यासारखा प्रकाशमान होत पुढे येतो. पण एखाद्याला काही कितीही चांगले गुण, विद्वत्ता असली आणि त्याची कुणी कदर केली नाही तर त्या कलागुणांना वाव न मिळाल्याने ते व्यक्तिमत्व खुरटून जाते. जसे अंगठीतल्या रत्नाला कोंदणाची सर्व आत वळलेली टोके हिरा किंवा रत्न घट्ट धरून ठेवतात. हल्लीच मी मुलीसाठी एक खड्याची अंगठी सोनाराकडून बनवून घेतली होती, ती मुलीला दिल्यानंतर तिने एक दोन वेळाच ती वापरली, पण तिच्यातला खडा कधी आणि कुठे आणि कसा पडला तिलाच समजले नाही. याचं कारण ज्यामध्ये खडा बसवलेला होता ते कोंदण बरोबर नव्हते. खडा किंवा रत्न हे धातूवर चिकटवून बसवता येत नाही, ते कोंदणाच्या घट्ट पकडीमुळे टिकून राहते. कोंदण म्हणजे आधार. कोंदण म्हणजे सुरक्षितता. जी एखाद्या बहुमोल, अनमोल रत्नासाठी आवश्यक असते.

त्या त्या गोष्टींसाठी तसेच कोंदण लाभले तर ते उठून दिसते. जसे हिरा किंवा इतर कुठलाही ग्रहाचा खडा हा सोन्याच्या कोंदणातच बसवला जातो, तिथे चांदीचा किंवा तांब्याचा इतर धातूचा वापर केला जात नाही. मोती, कोरल, गोमेद, केतू हे चांदीच्या कोंदणात बसवता येते. खाणीतील हिरा प्रथम पैलू पाडून घडवला जातो ती घडण, आणि मग कोंदणात बसवला जातो ती जडण. त्यासाठी रत्नजडित असा शब्द वापरला जातो.

जडणघडण मध्ये घडणचा अर्थ शेप देणे असा होतो, तर जडणचा अर्थ सुशोभित करणे असा होतो. कोंदण हे सुशोभित करण्यासाठी वापरले जाते. व्यक्ती संदर्भात तो कुठल्या कुटुंबात वाढला अशा अर्थाने ते त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडण करणारे कोंदण ठरते. कारण मुलांच्या विकासाला संस्काराचे कोंदण हवे, ते कुटुंब संस्थेत मिळू शकते.

हिरा सोन्याच्या कोंदणात शोभतो या वाक्यप्रकारानुसार उच्च दर्जाच्या व्यक्तीला उच्च पातळीवर काम करणे, उच्च पातळीवर राहणे शोभा देते. असा याचा अर्थ होतो. मौल्यवान धातूचा सुबकपणे घडवलेला आकार आणि खड्यासाठी बनवलेली खाच ही आधार असली तरी त्यातही सौंदर्य, देखणेपणा आणण्यासाठी कोंदणही सुंदर घडवले जाते. कोंदण केवळ रत्नासाठी आधार नसून त्यात कोरीव काम करून केलेली नक्षी, डिझाईन किंवा कलाकुसर असते, ती हिऱ्याच्या किंवा रत्नाच्या सौंदर्यात भर घालत असते. एखादी सौंदर्यवान वस्तू जेव्हा एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन विराजमान होते तेव्हा तिचे रूप सर्वांचे डोळे दिपवते. असा रत्नजडित, नाजूक कलाकुसर केलेला नेकलेस एखाद्या सुंदर रमणीच्या गळ्यात विराजमान होतो तेव्हा त्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते कारण ते योग्य ठिकाणी पोहोचलेले असते.

असं म्हणतात भावनेला बुद्धीचे कोंदण हवे. माणसाचे मन हे भावनेने व्यापलेले असते, कुठल्या वेळी काय कृती करावी हे मात्र भावनेच्या भरात कधी कधी माणसाला कळेनासे होते, ते ज्ञान आपल्याला बुद्धी देते. आपण भावनेच्या भरात घेतलेले बरेच निर्णय कधी कधी चुकीचे ठरू शकतात, म्हणून त्यावेळी डोक्याने काम केले पाहिजे म्हणजे तिथे बुद्धी वापरली पाहिजे, तेव्हाच काय चुकीचे काय बरोबर ते कळते. काही माणसे फारच भावनाशील असतात, या बाबतीत स्त्रिया जरा अग्रेसरच असतात, त्यामुळे व्यक्ती नुसती भावनिक असून चालत नाही, तिला व्यवहारज्ञान असले पाहिजे म्हणजे बुद्धिवादी असली पाहिजे.

समाजात विवाह या संस्काराला फार महत्त्व आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन टिकून राहण्यास मदत होते. पण आजकालची स्थिती पाहता घटस्फोटाच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. नुसत्या लग्नातील विधी करणे म्हणजे विवाह करणे नसून त्याला कायद्याची, समाजाची मान्यता मिळणे पण आवश्यक असते, म्हणून विवाह संस्काराला कायद्याचे कोंदण असले पाहिजे हे पटते.

सौंदर्य हे साधू वृत्तीच्या कोंदणात खुलून दिसते असे म्हटले जाते. सौंदर्य असेल तर त्या व्यक्तीच्या ठायी विनाकारण मी-पण, गर्वाची भावना निर्माण होत असते. ‘मी म्हणजे कोणीतरी विशेष, खास व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती आहे’ ही गोष्ट इतरांना पटवून देताना त्याचा मी-पणा वाढत असतो. त्या भरात इतरांचा अपमान, इतरांशी सतत तुलना, ‘तुमच्यापेक्षा मी किती सरस’ हे दाखवण्याचा प्रयत्न यामुळे त्या व्यक्तीच्या सौंदर्याला गालबोट लागते. लोक तिच्या सौंदर्याने प्रभावित होण्यापेक्षा तिच्या गर्विष्ठ स्वभावामुळे ती ओळखली जाऊ लागते, याला कारण म्हणजे तिच्या सौंदर्याला चांगल्या विचारांची बैठक नसते. त्या व्यक्तीचा स्वभाव साधुत्वाकडे झुकणारा पाहिजे, निरिच्छ असला पाहिजे, हे खरे मनाचे सौंदर्य ते जपले पाहिजे. त्यासाठी मनाची बैठक तशी हवी, त्या विचारांचे कोंदण मनाभोवती असले पाहिजे.

अशा अनेक कोंदणांनी आपले आयुष्य समृद्ध झालेले असते. कोंदण ही मनाची एक बैठक असते, त्यात तुमचे प्रतिबिंब पडते. मनाच्या कोंदणात शुक्राची चांदणी दिसण्याइतपत ते स्वच्छ, शुद्ध असले पाहिजे.    


- प्रतिभा कारंजकर, फोंडा