लता मंगेशकर यांच्या दैवी आवाजाची आणि 'आनंदघन' नावाने त्यांनी दिलेल्या संगीताची ही कहाणी आहे. 'मराठा तितुका मेळवावा' चित्रपटातील 'अखेरचा हा तुला दंडवत' या गाण्यातील भाव आणि संगीत यांचा अनुभव घ्या.
स्वर्गीय सुरांना जेव्हा स्वर्गीय संगीताची साथ लाभते, तेव्हा निर्माण होणारी कलाकृती ही अचंबित करणारी ठरते. असंच काहीसं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या बाबतीत झालं. विविध १४ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायलेल्या लता दीदी यांच्या गळ्यातून संगीतातील जे सूर येत गेले, त्यांना आपसूकच गर्भरेशमी साज चढत गेला...
‘लता मंगेशकर’ या नावाने संगीत क्षेत्रात अधिपत्य गाजवले. १९४२ सालापासून लता मंगेशकर यांनी गाणे गायला सुरुवात केली. १९४३ मधील गजाभाऊ चित्रपटातील ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे तू’ हे पहिले गाणे त्यांनी गायले. संगीत क्षेत्रात लता मंगेशकर यांना लता दीदी म्हणून ओळखत असत. त्यांनी आपले भवितव्य लता या नावाने सुरू केले. परंतु त्यांचे पाळण्यातले नाव हे हेमा होते, हे फारच थोड्या जणांना माहीत असेल! त्यांचे वडील मा. दीनानाथ हे ज्या ‘भावबंधन’ नाटकात काम करत होते, त्या नाटकातील नायिकेचे नाव लता लतिका होते. मा. दीनानाथ यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी आपल्या कन्येचे जे पाळण्यातले नाव हेमा होते, ते बदलून लता ठेवले आणि मग हेच नाव पुढे प्रचलित झाले.
गायनाच्या कारकिर्दीमध्ये सर्वोच्च स्थानावर असताना त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या ‘साधी माणसं’ या चित्रपटालाही संगीत दिले. तेव्हा लता दीदी यांची संगीताच्या, आवाजाच्या दुनियेत तुफान घोडदौड चालू होती. जर लता दीदी यांनी संगीतकार क्षेत्रात पदार्पण केले तर त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीवर काही विपरित परिणाम तर होणार नाही ना, या आशंकेने त्यांनी लता दीदी यांना सुरुवातीला नकार दिला. परंतु लता दिदींना तर साधी माणसं या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाचे काम करायचे होते. यावर उपाय म्हणून त्यांनी टोपणनाव घेऊन संगीत दिग्दर्शनाचे काम करण्याची तयारी दर्शवली आणि त्यांनी ‘आनंदघन’ या टोपण नावाने साधी माणसं या चित्रपटाला संगीत दिले. या चित्रपटाला जेव्हा संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला, तेव्हा आनंदघन नाव पुकारले गेले, तेव्हा लता दीदी हा पुरस्कार घेण्यास व्यासपीठावर गेल्या. तेव्हा आनंदघन म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात लता दीदीच आहेत, याची ओळख संगीत क्षेत्रात सर्वांना झाली. आणि मग पुढे त्यांनी अनेक चित्रपटांना ‘आनंदघन’ टोपण नावाने संगीत दिले. पार्श्वगायिका म्हणून त्यांच्या दैवी गळ्यातून आलेले सूर जितके तलम आणि गर्भरेशमी होते, तितकेच त्यांनी दिलेल्या संगीताच्या सुरातही तीच नजाकत होती.
‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटातील गीतांनाही लता दीदी यांनी आनंदघन या टोपण नावाने संगीत दिले. या चित्रपटातील...
अखेरचा हा तुला दंडवत!
सोडून जाते गाव...
दरीदरीतून मावळ देवा
देऊळ सोडून धाव!
या कवी संजीव यांनी लिहिलेल्या या गीताला लता दीदी यांनी संगीत देत आपला आवाजही दिला आणि दुग्धशर्करा योग जुळून आला. चित्रपटात हे गाणे बैलगाडीत चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीलाच बैलांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज या गाण्यातील संगीतात चपलखपणे वापरला आहे. तसेच सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीतून हा बैलगाडीचा प्रवास आहे, त्यामुळे दऱ्याखोऱ्यातून गाण्याचा आवाज घुमटणाऱ्या शब्दांचे प्रतिध्वनी या गाण्यात ऐकताना लता दीदींनी या गाण्याला संगीत देताना कमालीचा अभ्यास केला आहे, याची जाणीव होते. आणि हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते.
तुझ्या शिवारी जगले हसले
कडीकपारी अमृत प्याले
आता हे पारी सारे सरले
उरलं माग नाव... सोडून जाते गाव रे!
सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतला तेव्हा याच्याच कडीकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याचे अमृत पिऊन लहानाचे मोठे होताना जेव्हा हे सारे सोडण्याची पाळी येते, तेव्हा होणारे दुःख या शब्दांत व्यक्त केले गेले आहे.
हाय सोडूनी जाते आता
ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता
धरती दे ग ठाव
सोडूनी जाते गाव रे!
सीतेसारखी स्त्री ही या जगात सुरक्षित नाही... तिलाही रावणाने ओढून नेले. मग आता मला रक्षणारा वाली कोण? हा प्रश्न या गीतातील नायिकेला सतावतो आणि तिला हे सर्व नकोसे होते. सीतेला जसे धरती मातेने आपल्या गर्भात सुरक्षित घेतले, तसेच धरती मातेने आपल्या तळाशी ठाव द्यावा असे तिला मनोमन वाटते आणि ही तिच्या मनातील निराशा, उद्विग्नता लता दीदींनी आपल्या सुरात अतिशय प्रभावीपणे साकारली आहे.
हृदय पिळवटून टाकणारं हे गाणे
एकांतात ऐकताना डोळ्यातील अश्रू पाझरत राहतात!
- कविता आमोणकर