जीवनात सर्वकाही ठीक असतानाही मन का विषण्ण होते? 'डिप्रेशन' ही केवळ दुःखाची नव्हे, तर दडपलेल्या भावनांची गोष्ट आहे. या लेखात जाणून घेऊया मनाच्या गाभ्याची कथा.
“मॅम, तसं काही विशेष कारण नाही, पण तरीही मन कुठेतरी खोलवर खचलेलं वाटतं! सगळं ठीक चाललंय हो, तरी का असं होतंय?”
अशा प्रश्नांनी मी सहसा आता दचकत नाही. कारण हा प्रश्न इतक्या वेगवेगळ्या लोकांकडून, इतक्या वेगवेगळ्या शब्दांत ऐकलाय की आता त्याचं उत्तर द्यायचं असेल तर मी डोळे झाकूनही ते सांगू शकते. परंतु गंमत अशी आहे की ह्याचं उत्तर तसं सोपं नाहीच मुळी!
पूर्वी लोकांना असं वाटायचं की नैराश्याचं मूळ फक्त दुःखात असतं. पण खरी गोष्ट अशी आहे की नैराश्य हा एक बहुरंगी गुंता आहे व दुःख हा त्याचा फक्त एक भाग असतो. त्याच्या मागचं खरं गणित काहीसं वेगळंच असतं...
मनाचा बॅकस्टेज आणि दडवलेल्या भावना
त्या वर्षी तिचे चित्रपट सुपरहिट चालले होते. हातात अवॉर्ड्स, प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली कारकिर्द, लाखोंचे चाहते, बाहेरून सगळं परिपूर्ण दिसत होतं. परंतु तरीही, तिच्या मनात काहीतरी आतून तुटत होतं.
ती म्हणाली, “माझ्या आयुष्यात सगळं छान चाललं होतं, करिअर उत्कृष्ट होतं, कुटुंब, मित्र सगळे सोबत होते. तरीही एक अनामिक पोकळी जाणवायची. सकाळी उठायचंही मन होत नसे. सतत रडू यायचं कारणाशिवाय, कोणाशी बोलावसं वाटत नसे. काहीतरी आतून खचल्यासारखं वाटे. कोणतंही कारण नसताना मन उदास वाटायचं, जगण्यातला रस कमी झाला होता...”
ते वर्ष होते २०१५ आणि ती अभिनेत्री होती दीपिका पदुकोण. आता विचार करा, एक अभिनेत्री, जी लोकांसाठी यशाचं प्रतीक आहे, जिला जगभरातून कौतुक मिळतंय, तिचं असं म्हणणं म्हणजे काय? याचं उत्तर म्हणजे “नैराश्य अर्थात डिप्रेशन.” आपल्याला अनेकदा वाटतं की फक्त दुःखात किंवा अपयशामुळेच माणूस नैराश्यात जातो.
पण आजचा हा खरा अनुभव काही वेगळंच सत्य आपल्यापुढे मांडतोय..
नैराश्य म्हणजे नक्की काय?
नैराश्य केवळ दुःखाशी जोडलेलं नसतं. काही वेळा आपण आनंदी असतो, आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं असतं, तरीसुद्धा मनातून काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. ह्याला कारण फक्त आपल्या समस्या वा दुःख नसून राग, अपराधगंड, निराशा आणि आशाहीनता – ही चौकडी देखील आहे. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की रडणं म्हणजे कमकुवतपणा, रागावणं म्हणजे उद्धटपणा आणि अपराधी वाटणं म्हणजे स्वतःचा कमीपणा स्वीकारणं. मग हे लपवण्यासाठी सगळं कुठे जातं? थेट आपल्या मनाच्या आतल्या कप्प्यात!
राग, अपराधीपणा, लाज, अपमान, निराशा – या सर्व भावना आपण एका कल्पित गादीखाली दडवतो आणि समजतो की त्या तिथेच कायम राहतील. म्हणतात ना, नजरेआड सृष्टी! परंतु ही गादी म्हणजे एक मनोवैज्ञानिक ‘प्रेशर कुकर’ आहे हो! जिथे भावना अदृश्य न होता त्या शिजत राहतात आणि एके दिवशी, जेव्हा तो कुकर फुटतो, तेव्हा भात नव्हे, तर खोलवर लपलेलं आणि दडवून निर्माण झालेलं नैराश्य बाहेर पडतं ते असं की हा फुटण्याचा क्षणच आपल्याला खोल नैराश्याच्या गर्तेत लोटतो.
डॉ. बेसेल वॅन डर कोलक यांच्या ‘The Body Keeps the Score’ या पुस्तकात एक साधं पण महत्त्वाचं सत्य सांगितलं आहे, “शरीर कधीच विसरत नाही.” म्हणजेच, एखादी वेदना नाहीशी होत नाही, तर ती कधीतरी नवीन रूपात प्रकट होते. आपलं मनही तसंच आहे. दडवलेल्या भावना मूक होत नाहीत, तर त्या शरीरात कोठेतरी घर करून बसतात.
हे टाळण्यासाठी व डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी काय करायचं?
१. भावना जाणून घ्या व त्यास वैधता द्या – आपल्या आत काय चाललंय याकडे थोडं लक्ष द्या. उदाहरणार्थ, “माझा राग चुकीचा आहे,” असं म्हणण्याऐवजी, “माझा राग योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करेन,” असा विचार करा.
२. मोकळे व्हा, व्यक्त व्हा – एकटे नका राहू. कोणाशी तरी बोला. आणि जर कुणाशीच बोलावंसं वाटत नसेल, तर एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या.
३. स्वतःबद्दल ममत्व (empathy) बाळगा – “मी कमकुवत आहे” असं स्वतःला म्हणण्यापेक्षा, “मी माणूस आहे आणि माझ्या भावनांमुळे मी जिवंत आहे,” असं स्वतःला समजावणं अत्यंत गरजेचं आहे.
४. सर्जनशीलतेचा आधार घ्या – काही लोकांना चित्रकला, लेखन, नृत्य किंवा संगीताने मानसिक शांतता मिळते. भावनांना एक नवी दिशा द्यायची असेल, तर सर्जनशीलतेकडे वळा.
समुपदेशकाची भूमिका – “मनातलं मोकळं करणारा आरसा”
नैराश्याच्या ह्या गुंत्यात आपण आपल्या भावनांच्या जाळ्यात इतके अडकतो की त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. तिथे समुपदेशकाचा रोल महत्त्वाचा ठरतो. हा काउन्सिलर किंवा मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे फक्त सल्लागार नव्हे. तो किंवा ती म्हणजे एक असा आरसा, जो तुमच्या मनातल्या दडलेल्या भावनांचं स्पष्ट प्रतिबिंब दाखवतो. ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःलाही स्पष्ट दिसत नाहीत, त्या समजून घ्यायला मदत करतो.
मग प्रश्न येतो – “डिप्रेशनमध्ये असताना काउन्सिलिंगला जायचं कसं वाटेल?” खरं सांगायचं, तर डॉक्टरकडे जावं लागतं तसं जबरदस्तीने नाही, पण मनाला मोकळं करायची इच्छा असेल, तर नक्कीच या. डिप्रेशनचं मूळ शोधायचं असेल, तर फक्त मन नव्हे, तर आपल्या शरीराचंही ऐका. भावनांना दाबून ठेवून, एखाद्या दिवशी त्या विसरल्या जातील असं वाटत असेल, तर त्या चुकीच्या समजुती आहेत. कारण आपलं मन विसरण्याचा आभास नक्कीच निर्माण करू शकतं पण शरीर नाही.
म्हणून, ऐका... स्वतःचं मन आणि शरीर काय सांगतंय ते!
- मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४