नेमप्लेट

स्त्री-पुरुष तुलना हा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. समाजमाध्यमांवर याबद्दल टोकाची मते मांडली जातात. मात्र, स्त्री आणि पुरुष यांच्यात तुलना करणेच चुकीचे आहे, हे वास्तव स्वीकारून दोघांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे.

Story: आवडलेलं |
04th April, 10:00 pm
नेमप्लेट

स्त्री-पुरुष तुलना या विषयावर अनेक जणांनी, अनेक बाजूंनी, अनेक पद्धतींनी आणि अनेक वेळा लिहिले आहे. आजकाल स्त्रीवाद हा खरेतर चेष्टेचा विषयदेखील झाला आहे, विशेषतः समाजमाध्यमांवर. अतिशय टोकाची मते आणि ती मांडण्याची तितकीच टोकाची पद्धत हेच त्यामागचे कारण असावे. या विषयावर बोलताना किंवा लिहिताना मला नेहमी माझ्या शाळेतल्या एका शिक्षिकेचे म्हणणे आठवते. त्यांनी जेव्हा आम्हाला हे सांगितले, तेव्हा कदाचित ते कळण्याइतपत मी प्रगल्भ नव्हते; पण त्यांची सांगण्याची पद्धत अशी होती की त्यांनी काय सांगितले यापेक्षा त्यांनी कसे सांगितले हे जास्त लक्षात राहिले. वय, समज वाढली, तसे हळूहळू ते समजत गेले. त्या म्हणाल्या होत्या, स्त्री आणि पुरुष मूलतः वेगवेगळे आहेतच. त्यामुळे त्यांच्यात तुलना करणे हेच मुळात चूक आहे आणि दोघांपैकी श्रेष्ठ कोण हे ठरवणे आणि त्यावर वाद करणे हे तर त्याहून चुकीचे आहे. त्या म्हणाल्या होत्या की दोघांचे हे भिन्न असणे मान्य करून, दोघांनी आपापल्या पातळीवर स्वतःला आणि दुसऱ्याला स्वीकारणे हे सर्वोत्तम!

हे आत्ता पटत असले, तरीही कित्येकदा आपणच बाई असण्याचे भांडवल करतो असे वाटल्याशिवाय राहत नाही. अगदी छोटी छोटी निमित्तं होतात आणि आपण त्याचा संबंध आपल्या बाई असण्यावर नेतो. काही वेळा त्यात अगदीच तथ्य नसते असेही माझे म्हणणे नाही. बायकांना अनेक आव्हाने असतात, पण तशी ती पुरुषांसमोरही असतात. निसर्गाने वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता दिलेल्या असल्यामुळे ही आव्हानेही वेगवेगळी असतात, पण बऱ्याचदा फक्त बायकांपुढची आव्हाने अधोरेखित केली जातात... कदाचित त्या जास्त व्यक्त होत असतील त्यामुळे? कारण माहीत नाही, पण असे होते हे मात्र खरे.

हे उलट बाजूनेही होते. स्त्री सहनशील, तर पुरुष कठोर हा समाजाने लादलेला एक मोठा गैरसमज पिढ्यानपिढ्या आपण पुढे नेत आहोत असे बऱ्याचदा जाणवते. पैसे कमवणे हे पुरुषाचे काम आणि घर सांभाळणे हे बाईचे हाही असाच एक समज. म्हणूनच अगदी आजच्या तारखेलाही जर एखादा पुरुष घर सांभाळत असेल किंवा नोकरी करून घर सांभाळत असेल, तर त्याचे कौतुक केले जाते. खरेतर, यात कौतुक करण्यासारखे काही आहे असे वाटणे जेव्हा बंद होईल, तेव्हा आपण समानतेविषयी बोलताना एका वेगळ्या पातळीवर, वेगळे पैलू उलगडून बोलू शकू असे वाटते. बदल घडत आहे, नाही असे नाही, पण या बदलाची गती मात्र संथ आहे. मी इथे घरकाम करणाऱ्या पुरुषाच्या कौतुक करण्याबद्दल आक्षेप असण्याचे लिहिते आहे, पण असे पुरुष; जे घर सांभाळतात, मुले सांभाळतात, स्वयंपाक करतात त्यांना अनेक वेळेला खरेतर निंदा सहन करावी लागते. त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित केला जातो. आणि गंमत म्हणजे या सगळ्याचे परिणाम पुरुषांबरोबर बायकांवरही होतात, त्यांनाही निंदेला, टोमण्यांना तोंड द्यावे लागते आणि तिच्या बाईपणावरही प्रश्न उपस्थित केले जातात.

‘नेमप्लेट’ हा या विषयावरचा एक सुंदर लघुपट आहे. पारंपरिक जडणघडण असणाऱ्या घरांत, मुलगा आणि सून नोकरी करत असताना सून जास्त प्रगती करते हे सासऱ्यांना रुचत नाही. सुनेच्या प्रगतीचे कौतुक वाटण्याचे सोडून ते असुरक्षित होतात आणि मुलाला दूषणे देतात, का तर जे त्याने करणे अपेक्षित (समाजाच्या दृष्टीने) आहे ते तिने केले म्हणून. या दूषणांची झळ सुनेपर्यंतही पोहोचते, कारण तिच्या प्रगतीचा संबंध तिच्या बाईपणाशी जोडला जातो. ती प्रगती करते म्हणजे ती हक्क गाजवणारी, आपले म्हणणे नवऱ्याच्या गळी उतरणारी असा समज सहज केला जातो. प्रत्येकाची प्राथमिकता वेगळी असू शकते आणि तिचा आपल्या स्त्री किंवा पुरुष असण्याशी काहीच संबंध नाही ही खरेतर इतकी साधी गोष्ट, पण आपल्या स्त्री किंवा पुरुष असण्यात आपण इतके अडकून पडतो की या सगळ्याचा जणू विसरच पडलेला असतो.

सासरे आणि सून यांच्यामधली एक दरी आणि वडील आणि मुलगा यांच्यामध्ये एक दरी अशी या लघुपटाची संकल्पना मला फार आवडली. एकमेकांबद्दल असणाऱ्या गैरसमजाला बळी न पडता आई आणि मुलगा ही दरी कशी अलगदपणे सांधतात त्याची ही छानशी गोष्ट आहे.

आपण आपले श्रेष्ठ असणे अनेक पद्धतीने सिद्ध करायला बघत असतो. माणूस म्हणून ती आपली गरज असेल, पण अनेकदा दुसऱ्याचे आपल्यापेक्षा कनिष्ठ असणे हे आपल्याला आपल्या श्रेष्ठ असण्याची हमी देणारे वाटत असते... किंवा तसा समज आपल्यावर लादला गेलेला असतो. त्यातून बाहेर पडणे आणि आपल्या पुढच्या पिढीला त्यात गुरफटू न देणे हे आपल्यापुढे असणारे मोठे आव्हान म्हणावे लागेल. अशा लघुपटांनिमित्ताने त्यावर विचार होतो ही गोष्ट फार सकारात्मक वाटते.



- मुग्धा मणेरीकर, फोंडा