महिलांची त्वचा पुरुषांच्या तुलनेत अधिक संवेदनशील असल्याने आणि हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर लवकर परिणाम होतो. तसेच, महिला सौंदर्य आणि त्वचेच्या काळजीबाबत अधिक जागरूक असल्याने, सनस्क्रीनचा नियमित वापर त्वचेचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
सनस्क्रीन हे त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे उत्पादन आहे. याचे मुख्य कार्य सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचा बचाव करणे आहे, ज्याचा दीर्घकालीन प्रभाव त्वचेसाठी खूप हानिकारक असू शकतो.
उन्हाचा सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सनस्क्रीनचा वापर महत्त्वाचा आहेच, पण महिलांमध्ये सनस्क्रीनच्या वापराचे विशेष महत्त्व आहे. महिलांच्या त्वचेचे प्रकार, त्यांची काळजी घेण्याची मानसिकता आणि बाह्य सौंदर्याची जाणीव यांच्या बाबतीत त्या पुरुषांपेक्षा जास्त जागरूक असू शकतात. चला तर, आज आपण महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक नियमितपणे सनस्क्रीन वापरणे का आवश्यक आहे व त्याचा योग्य वापर यावर चर्चा करूया.
महिलांनी सनस्क्रीन रोज वापरणे का आवश्यक?
त्वचेची नाजूकता आणि संवेदनशीलता: सामान्यपणे महिलांची त्वचा पुरुषांच्या तुलनेत अधिक नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे, अतिनील किरणांचा जास्त परिणाम महिलांच्या त्वचेवर होऊ शकतो. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेमध्ये फिकटपणा, डाग आणि सुरकुत्या येण्याची शक्यता अधिक असू शकते.
हार्मोनल बदल: पुरुषांच्या तुलनेत महिलांची हार्मोनल पातळी वारंवार बदलते. या हार्मोनल बदलांमुळे म्हणजेच मासिक पाळी, गर्भावस्था आणि रजोनिवृत्तीच्या दरम्यान महिलांच्या त्वचेची संवेदनशीलता वाढलेली असू शकते.
त्वचेवरील वृद्धत्वाच्या लक्षणांचा व कर्करोगाचा धोका: अतिनील-ए प्रकारच्या किरणांमुळे त्वचेला काही काळानंतर सुरकुत्या, त्वचेची लवचिकता कमी होणे, त्वचेवर सूज येणे यांसारख्या वृद्धत्वाच्या लक्षणांचा सामना करावा लागतो. अतिनील किरणांमुळे त्वचेवर होणारे बदल महिलांसाठी फारच त्रासदायक असू शकतात. सनस्क्रीनचा निय मित वापर महिलांना सूर्याच्या हानिकारक अतिनील-ए आणि अतिनील-बी किरणांपासून संरक्षण देऊन त्वचेचे कर्करोग होण्याचा धोका व वृद्धत्वाची लक्षणे कमी करतो.
गर्भावस्थेत विशेष काळजी: गर्भावस्थेदरम्यान, महिलांच्या त्वचेमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्यांची त्वचा संवेदनशील झालेली असते, तसेच यादरम्यान अधिक पिगमेंटेशन (डाग) होण्याची शक्यता वाढलेली असते, ज्याला "मास्क ऑफ प्रेग्नंसी" किंवा "मेलास्मा" असे म्हणतात. अतिनील किरणांमुळे ही स्थिती अधिक तीव्र होऊ शकते. गर्भवती महिलांनी विशेष करून सनस्क्रीन वापरावे, ज्यामुळे त्यांच्या त्वचेचे संरक्षण होईल.
सौंदर्य आणि त्वचेची काळजी: महिलांना त्वचेची अधिक काळजी घेण्याची प्रवृत्ती असते आणि यासाठी सनस्क्रीन हा एक महत्त्वाचा भाग आहे. सूर्याच्या किरणांमुळे होणारे त्वचेवरील परिणाम जसे पिगमेंटेशन, जळजळ होणे आणि डाग महिलांसाठी एक चिंतेचा विषय होऊ शकतो. त्यामुळे, महिलांना सनस्क्रीनच्या नियमित वापराने त्वचा नितळ, निरोगी आणि सुरक्षित ठेवता येते.
सनस्क्रीनचा वापर कसा करावा?
सनस्क्रीनचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. साधारणपणे एका व्यक्तीसाठी सनस्क्रीनचे योग्य प्रमाण १ ते १.५ चमचे (१५-२० मिली) असावे. ते शरीराच्या सर्व भागावर समानरीतीने लावावे. सनस्क्रीन सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी १५-३० मिनिटे आधी लावावे. पाण्यात जात असल्यास किंवा घाम येत असल्यास सनस्क्रीनचे संरक्षण एका वेळेस पुरेसे होत नाही. अशा वेळी दर २ ते ३ तासांनी सनस्क्रीन परत लावणे आवश्यक आहे. सन प्रोटेक्शन फॅक्टर (एस.पी.एफ.) म्हणजे सनस्क्रीनमध्ये असलेल्या किरणांपासून संरक्षण करण्याची क्षमता ३० किंवा अधिक असलेल्या सनस्क्रीनचा वापर करावा. तसेच आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून आणि त्यानुसार योग्य सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे. तेलकट त्वचेसाठी ऑईल-फ्री सनस्क्रीन, कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग सनस्क्रीन व संवेदनशील त्वचेसाठी हायपोअलर्जेनिक सनस्क्रीन वापरावी.
कधी कधी सनस्क्रीनचा वापर फक्त उन्हातच नाही तर घरात देखील केला जाऊ शकतो. घरात देखील खिडक्यांमधून अतिनील-ए किरणांचा प्रवेश होतो. विशेष करून तासंतास ऑफिसमध्ये किंवा घरात काम करत असल्यास किंवा लॅपटॉप आणि मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह वेळ घालवत असल्यास सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक आहे.