स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता
पणजी : गोवा विद्यापीठाने घेतलेला एक निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गोवा विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांत गोव्याबाहेरील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कोटा जवळपास दुप्पट करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांच्या जागा कमी होऊन त्यांच्यावर अन्याय होणार आहे.
गोवा विद्यापीठाच्या संकेस्थळावर उपलब्ध असलेल्या गोवा विद्यापीठ प्रवेश रँकिंग टेस्ट (जीयूएआरटी) २०२५-२६ च्या ब्रोशरमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. २०२४-२५ मध्ये बाहेरील विद्यार्थ्यांना १० टक्के जागा आरक्षित होत्या. मात्र कमाल दोनच जागांवर आरक्षण देण्यात येत होते. २०२५-२६ मध्ये कमाल दोन जागा आरक्षित ठेवण्याचा नियम वगळण्यात आला आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना कमी जागा उरणार आहेत. विविध अभ्यासक्रमात असणारे आरक्षण असल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २०२४-२५ मध्ये विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण ११८१ जागा होत्या. यातील ६८ जागा बाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या. यंदा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण ११३३ जागा आहेत. यातील ११२ जागा बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या. तर विद्यापीठाच्या संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात गेल्या वर्षी १०९४ जागा पैकी बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ५४ जागा होत्या. यंदा एकूण १०४६ पैकी १०५ जागा बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमानुसार बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना १ ते १० जागा आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामुळे एमएससी (रसायनशास्त्र), एमसीए, एमकॉम अशा मागणी जास्त असलेल्या अभ्यासक्रमांमधील स्थानिकांना कमी जागा मिळणार आहेत. यामुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना खर्चिक असणाऱ्या खासगी महाविद्यालयात, विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागण्याची शक्यता आहे.
बाहेरील विद्यार्थ्यांच्या जागा
विषय वर्ष २०२४-२५ वर्ष २०२५-२६
एमए इंग्रजी २ ६
एमए कोंकणी २ ६
एमए इतिहास २ ६
एमएससी रसायनशास्त्र २ १०