राज्यात दिवसाला सरासरी ३५ जणांना कुत्र्यांचा चावा

एकात्मिक आरोग्य पोर्टलवरील माहिती : २०२४ मध्ये सर्वाधिक १७,२३६ जणांना दंश


03rd April, 12:33 am
राज्यात दिवसाला सरासरी ३५ जणांना कुत्र्यांचा चावा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात मागील तीन वर्षे एक महिना कालावधीत कुत्रे चावण्याच्या ३८ हजार १९७ घटनांची नोंद झाली आहे. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १,०५३ तर दिवसाला सरासरी ३५ जणांना कुत्र्यांनी चावण्याचा घटना घडल्या आहेत. राज्य सरकारने एकात्मिक आरोग्य माहिती पोर्टलवर ही माहिती अपलोड केली आहे. केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री एस. पी. सिंग बाघेल यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार हिबी इडेन यांनी प्रश्न विचारला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात वर्ष २०२२ मध्ये कुत्रे चावण्याच्या ८,०५७ घटनांची नोंद झाली होती. २०२३ मध्ये ही संख्या वाढून ११ हजार ९०४ झाली, तर २०२४ मध्ये त्यात आणखी भर पडून ती १७ हजार २३६ झाली. जानेवारी २०२५ या एका महिन्यात कुत्रा चावण्याच्या १,७८९ घटना घडल्या. जानेवारी २०२५ चा विचार करता दिवसाला सरासरी ५८ जणांना कुत्रा चावला. संपूर्ण देशाचा विचार करता २०२२ मध्ये २१.८९ लाख, २०२३ मध्ये ३०.५२ लाख, तर २०२४ मध्ये ३७.१५ लाख कुत्रे चावल्याच्या घटनांची नोंद झाली.
वरील कालावधीत कुत्रे चावण्याच्या सर्वाधिक १४.०६ लाख घटना महाराष्ट्रात घडल्या. यानंतर तामिळनाडू राज्यात (१३.३३ लाख), गुजरातमध्ये (८.९२ लाख) कुत्रे चावण्याचा घटनांची नोंद झाली. केंद्र सरकार राष्ट्रीय रेबीज नियंत्रण प्रकल्प अंतर्गत राज्य सरकारला मदत करत आहे. कुत्रे किंवा अन्य जनावर चावल्यास आवश्यक ती आरोग्य सुविधा राज्य सरकारमार्फत पुरवली जात आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येत असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
रेबीजमुळे १२६ जणांचा मृत्यू
उत्तरात म्हटले आहे की, देशभरात जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२५ दरम्यान रेबीजची लागण झालेल्या १२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. वरील कालावधीत महाराष्ट्रातील ३५, कर्नाटकमधील १२, तर तामिळनाडूतील ९ जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता.

हेही वाचा