आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून स्पष्ट : राज्यात सुमारे ३००० किमी रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या सहा वर्षांच्या काळात सरकारने राज्यातील रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणावर सुमारे १,७५३ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या सहा वर्षांच्या काळात सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले आहे, असे आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून समोर आले आहे.
दरवर्षी उन्हाळा सुरू होताच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून (पीडब्ल्यूडी) राज्यातील रस्त्यांची दुरुस्ती, तसेच हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येते. प्रत्येक वर्षी रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणावर कोट्यवधी रुपये उधळले जातात. परंतु, पावसाळा येताच पुन्हा रस्ते खड्ड्यांनी भरत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत सातत्याने समोर आले आहे. अशा स्थितीत गेल्या सहा वर्षांच्या काळात सरकारने केवळ रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणावर सुमारे १,७५३ कोटी खर्च केले असून, त्यातून तीन हजार किमीपेक्षा अधिक रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण झाले असल्याचे अहवालातील आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येते.
ग्राम सडक योजनेअंतर्गत ६२.६२ किमीचे रस्ते
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते आणि पुलासंदर्भातील १४ प्रकल्पांवर १२६ कोटींचा खर्च करण्यात आला. या योजनेअंतर्गत ११ रस्ते आणि तीन पूल, असे मिळून ६२.६२ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यावर १२६ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचेही आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून दिसून येते.