पहिल्यांदा मांद्रे आणि त्यानंतर प्रियोळ मतदारसंघात जाऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युतीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यांमुळे भाजप-मगो कार्यकर्त्यांसह मतदारही संभ्रमात पडलेले आहेत. मांद्रे सध्या मगोकडे असतानाही पुढील विधानसभा निवडणुकीत तेथे भाजप उमेदवार देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली. त्यानंतर लगेचच मगो आतापासूनच दावा करीत असलेल्या प्रियोळमध्ये जाऊन त्यांनी प्रियोळही भाजपकडेच राहील, असे स्पष्ट केले. त्याच्याही पुढे जाऊन ज्यांना हे मान्य नाही, त्यांनी आताच चालते व्हावे, असा दमही त्यांनी ढवळीकर बंधूंचे नाव न घेता भरला. युतीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांचा मनात नेमके चाललेय काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
येत्या डिसेंबरमध्ये राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक, मार्च २०२६ मध्ये पणजी मनपाची निवडणूक, मे २०२६ मध्ये अकराही पालिकांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू होईल. भाजपने गेल्या दोन वर्षांपासूनच या सर्व निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. सद्यस्थितीत भाजपकडे विधानसभेत ३३ आमदारांचे बळ आहे. यातील २८ आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याच्याच दिशेने भाजपने वाटचाल सुरू केलेली आहे. गेली सहा वर्षे डॉ. सावंत मुख्यमंत्रिदावर आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर आणि २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने त्यांच्यावरच विश्वास ठेवला आणि त्यांनी पक्षाचा हा विश्वास सार्थही ठरवून दाखवलेला आहे. या सहा वर्षांच्या काळात राजकीयदृष्ट्या परिपक्व झालेल्या मुख्यमंत्र्यांना आता विधानसभा निवडणुकीत केवळ भाजपचीच सत्ता आणून, आपले स्थान अजून बळकट करायचे आहे. त्याचीच सुरुवात म्हणून मगोला सत्तेतून बाहेर काढण्यासाठीच त्यांनी मांद्रे आणि प्रियोळमध्ये जाणीवपूर्वक तशी वक्तव्ये केल्याचा अंदाज कार्यकर्त्यांकडून बांधला जात आहे.
दामू नाईक भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी, पक्षीय पातळीवरही दिल्लीत डॉ. सावंत यांच्याच शब्दाला अधिक वजन आहे. २०१९ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीतील विजयात डॉ. सावंत यांचाच वाटा मोठा आहे. विरोधकांच्या मतदारसंघांतील कामे अगोदर करून देण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे विरोधकांचाही त्यांच्याबाबतचा विरोध मावळत चालला आहे. या सर्व गोष्टींची पूर्णत: जाणीव असल्यामुळेच स्वत:च्या हिंमतीवर एकहाती राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न मगोला आताच सत्तेबाहेर काढून ते पूर्ण करू शकतील, यात सध्यातरी शंका वाटत नाही.
सिद्धार्थ कांबळे
(लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)