लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नितीन गडकरी यांनी उत्तर दिले.
नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या अहवालानुसार, देशात २२ लाख कुशल चालकांची कमतरता आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत ही माहिती दिली. योग्य प्रशिक्षणाअभावी अनेक अपघात होत आहेत असे ते म्हणाले. केंद्राने चालकांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी ४,५०० कोटी रुपयांची योजना सुरू केली आहे, अशी माहिती लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, गडकरींनी दिली.
१६०० प्रशिक्षण संस्था उघडल्या जातील
निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे अनेक अपघात आणि मृत्यू होतात. ते म्हणाले की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १६०० प्रशिक्षण संस्था स्थापन केल्या जातील. यामुळे ६० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील, असे गडकरी म्हणाले. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना क्लस्टर दृष्टिकोनासह ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयडीटीआर), प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रे (आरडीटीसी) आणि ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रे (डीटीसी) स्थापन करण्यासाठी योग्य प्रस्ताव पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. दरवर्षी सुमारे १.८ लाख लोक रस्ते अपघातांमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यापैकी बरेच अपघात हे अप्रशिक्षित चालकांमुळे होतात असे गडकरी म्हणाले.
५५.१ टक्के ट्रक चालकांची दृष्टी कमकुवत
यापूर्वी, एका अहवालात असे दिसून आले होते की भारतातील सुमारे ५५.१ टक्के ट्रक चालकांची दृष्टी कमकुवत आहे, तर ५३.३ टक्के लोकांना दूरच्या दृष्टीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि ४६.७ टक्के लोकांना जवळच्या दृष्टीसाठी उपचारांची आवश्यकता आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्लीने तयार केलेल्या अहवालानुसार, सुमारे ४४.३ टक्के ड्रायव्हर्सचा बॉडी मास इंडेक्स (BMI) सीमारेषा किंवा त्याहून अधिक होता, तर ५७.४ टक्के ड्रायव्हर्सचा उच्च रक्तदाब आणि १८.४ टक्के ड्रायव्हर्सचा रक्तातील साखरेचा स्तर सीमारेषा किंवा त्याहून अधिक होता.