पैसे घेऊन सायबर गुन्हेगार पसार झाले
पणजी : शेअर्स ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याची बतावणी करत बेळगाव येथील एका सॉफ्टवेअर इंजिनियरला सायबर गुन्हेगारांनी तब्बल १.०७ कोटी रुपयांना ठकवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत बेळगाव येथील सायबर इकॉनॉमिक अँड नार्कोटिक्स (सीईएन) पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या तक्रारीवर सीईएन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करत आहेत.
नेमके प्रकरण काय ?
दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील रजत हा ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून स्कॅमर्सच्या संपर्कात आला होता. त्यांच्या सांगण्यावरून रजतने प्लेस्टोर मधून अबंसे प्रो हे ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करून एका कंपनीमध्ये सुरुवातीला १५ लाख रुपये गुंतवले होते. सुरवातीला त्याला तब्बल ७ लाखांचा नफा झाला. नफ्याचे हे पैसे त्याच्या बँक खात्यावर देखील जमा झाले. त्याचा विश्वास संपादन झाल्याचे लक्षात येताच फसवणूक करणाऱ्यांनी आपला रंग दाखवण्यास सुरुवात केले. रजतला अजून पैसे जमा करण्यात त्यांनी सांगितले. संबंधित ॲपवर त्याचा विश्वास बसला आणि त्याने टप्प्याटप्प्याने तब्बल १ कोटी ७ लाख रुपये गुंतवले. त्याच्या बदल्यात रजतच्या खात्यावर नफ्या दाखल तब्बल ११ कोटी रुपये जमा दाखवण्यात आले.
मात्र प्रत्यक्षात खात्यावर पैसे जमाच झाले नाही. रजतने किमान २-३ आठवडे ॲपशी निगडीत लोकांकडे पैशांसाठी संपर्क साधला पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. दरम्यान आपण फसलो गेलो हे लक्षात येताच रजत याने २९ मार्च रोजी सीईएन पोलीस स्थानकात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. रजत गेल्या जानेवारी महिन्यापासून संबंधित ॲपच्या माध्यमातून पैसे गुंतवत होता. गुंतवलेल्या पैशांचा मोठा परतावा देण्याचे दिशाभूल करणारी हमी देणाऱ्या जाहिरातींना भुलून लोक अशा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहेत. कोणताही कायदेशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कधीही गुंतवणूकदारांना एखाद्या व्यक्तीच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यास सांगत नाही. अज्ञात प्लॅटफॉर्मवर व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे या संदर्भात बोलताना सीईएन पोलीस निरीक्षक बी. आर. गडेकर यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञान प्रगत होत असताना त्याचा गैरवापर करणारे देखील उदयास येत आहे. हे भामटे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक करून, त्यांच्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात लाटून मोकळे होतात. पोलीस, प्रशासन आणि सरकारने याबाबत व्यापक प्रमाणात जागृती करूनही याचा फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. लोकांनी निदान आता तरी सुज्ञपणे विचार करून पैशांचा व्यवहार करावा असेही आवाहन निरीक्षकांनी केले.