खानापूर : नंदगड येथील वृद्ध आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत वीस वर्षांचा कारावास

चॉकलेटचे आमिष दाखवून केला होता चार वर्षीय चिमूकलीवर लैंगिक अत्याचार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th April, 12:02 pm
खानापूर : नंदगड येथील वृद्ध आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत वीस वर्षांचा कारावास

पणजी : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील एका वृद्धाला, चार वर्षीय चिमूकलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली, पोक्सो न्यायालयाने २० वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सदर आरोपीची काल ३ एप्रिल रोजी, सायंकाळी हिंडलगा कारागृहात  रवानगी करण्यात आली. 

नेमके प्रकरण काय ? 

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार,  मागील वर्षी फेब्रुवारी २०२४ रोजी, नंदगड येथील काकर गल्लीत राहणाऱ्या ६८ वर्षीय निसार अहमद फखरूसाब चापगावी या वृद्धाने, शेजारच्या चार वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर, याबाबत नंदगड पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली. स्थानकाचे निरीक्षक सी एस पाटील यांनी सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तपास कार्य गतिमान केले. २८ फेब्रुवारी रोजी, आरोपीविरोधात पोक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. 

दरम्यान, तपासकाम पूर्ण झाल्यानंतर काल सदर आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली व आरोपी निसार अहमद फक्रूसाब चापगावी याला पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश सी.एम. पुष्पलता यांनी वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर आरोपीला हिंडलगा कारागृहात पाठविण्यात आले. या खटल्या संदर्भात सरकारच्या वतीने पब्लिक प्रॉसिकेटर वकील म्हणून एल व्ही. पाटील यांनी आरोपी विरोधात बाजू मांडली. 


हेही वाचा