तिसवाडी : औद्योगिक सुरक्षिततेसाठी ‘स्किल ऑन व्हील्स’ उपक्रम : मुख्यमंत्री सावंत

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th April, 02:24 pm
तिसवाडी : औद्योगिक सुरक्षिततेसाठी ‘स्किल ऑन व्हील्स’ उपक्रम : मुख्यमंत्री सावंत

पणजी : राज्यातील औद्योगिक कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध असून, याच उद्देशाने ‘स्किल ऑन व्हील्स’ उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गुरुवारी पणजीत आयोजित पहिल्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'स्किल ऑन व्हील्स' उपक्रमाद्वारे शाळा , महाविद्यालयात औद्योगिक दुर्घटना, विद्युत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन तसेच मानसिक आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.  राज्यात विविध औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खाजगी कंपन्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच्याकडे केवळ एक जबाबदारी म्हणून पाहू नये. सुरक्षा असल्यास कामगारांच्या कामाचा दर्जा देखील वाढतो. याचा फायदा कंपन्यांनाच होतो. 

खागजी कंपन्या तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी देखील हे प्रदर्शन आवर्जून पहावे. कारखाने आणि बॉयलर खात्याने बॉयलर चालक अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामुळे तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. अन्य सरकारी खात्याने देखील सुरक्षेला प्राधान्य देणारे उपक्रम सुरू करावेत. विकसित गोवा २०३७ चे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. युवकांनी उपलब्ध संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा