बसचालक ताब्यात : कुंकळ्ळी पोलिसांचा तपास सुरु
मडगाव : पाडी बार्शे याठिकाणी बुधवारी रात्री बसच्या धडकेत दोघा तरुणांना मृत्यू झाला. गंभीर जखमी दिलीप वेळीप (३८) व संदेश गावकर (२७) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी राजेश शिवोल्ली (५५) या बसचालकाला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच बसही जप्त केली आहे.
कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाडी बार्शे येथील एका वळणावर हा अपघात घडला. दिलीप वेळीप व संदेश गावकर हे दोघे रात्री कामावर जात होते. वळणावर बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसची धडक दुचाकीला बसली. यात दिलीप व संदेश हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर खासगी बसचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, जखमींना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळावरुन पसार झालेल्या बसचालकासह बस यल्लापूर येथून ताब्यात घेतली. त्यानंतर बसचालकावर गुन्हा नोंद करून त्याला रितसर अटक केलेली आहे.बस मडगाव येथून बंगळुरू येथे जात होती.
पाडीतील या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून सुमारे २० लोकांनी या रस्त्यावर जीव गमावला आहे. महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल, पण तोपर्यंत उपाययोजना करण्याची गरज आहे. राज्य सरकारने अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या या वळणावरील रस्ता रुंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रशांत नाईक यांनी केलेली आहे.