उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे करासवाडा येथे होणार भवन

रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:46 am
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे करासवाडा येथे होणार भवन

पणजी : उत्तर गोव्यात झेडपी भवन उभारण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झेडपी भवनाला मंजुरी मिळू शकते. सध्या झेडपीचे कार्यालय बांदोडकर भवनात जुन्ता हाऊसमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. झेडपी भवन तयार झाल्यानंतर ही कचेरी नवीन भवनात हलवली जाईल, असे जिल्हा पंचायत माजी अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी सांगितले.

मंगळवारी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची आमसभा झाली. यावेळी उत्तर गोव्यातील २५ मतदारसंघांतील जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपाध्यक्ष निहारिका मांद्रेकर, सीईओ अजय गावडे आणि माजी अध्यक्ष सिद्धेश नाईक उपस्थित होते.

‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या आमसभेत ठराव संमत करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर यांनी दिली. ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ अंमलात आली, तर विधानसभा निवडणुकांनंतर १०० दिवसांच्या आत जिल्हा पंचायत निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे माजी अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुका विधानसभा निवडणुकांपूर्वी नव्हे, तर नंतर होतील.

शंकर चोडणकर यांनी सांगितले की, एक राष्ट्र एक निवडणूक ही आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असल्याने या निर्णयाला पाठिंबा देत ठराव संमत करण्यात आला आणि तो सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

सिद्धेश नाईक यांनी सांगितले की, जर ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ अंमलात आली, तर जिल्हा पंचायत निवडणुका विधानसभा निवडणुकांनंतर होतील. यात एक कलम आहे की, विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था जसे पंचायत, नगरपालिका आणि जिल्हा पंचायत निवडणुका १०० दिवसांच्या आत घ्याव्यात. त्यामुळे ‘एक राष्ट्र एक निवडणूक’च्या अंमलबजावणीखाली जिल्हा पंचायत निवडणुका विधानसभा व लोकसभा निवडणुकांनंतर घेतल्या जातील, असे नाईक यांनी सांगितले.

जिल्हा पंचायतीची स्थापना २००० साली झाली असून २०२५ मध्ये २५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे शंकर चोडणकर यांनी सांगितले.



हेही वाचा