मोहाली कोर्टाचा झटका; २०१८ मधील बलात्कार प्रकरणी ठरवले दोषी
चंदीगड: 'मेरा येसू येसू' फेम पाद्री बजिंदर सिंग यांना मंगळवारी २०१८ च्या बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहालीच्या जिल्हा न्यायालयाने बजिंदरला ३ दिवसांपूर्वी दोषी ठरवले होते आणि अखेर मंगळवारी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१८ मध्ये, या ४२ वर्षीय पाद्रीला पंजाबच्या झिरकपूर येथील एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
झिरकपूर पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे २०१८ मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिलेने असे आरोप केले होते की सदर पाद्रीने परदेशात जाण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवून त्यांना फसवले आणि मोहालीच्या सेक्टर ६३ येथील त्याच्या निवासस्थानी तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेचा व्हिडिओही बनवला आणि त्याच्या मागण्या मान्य न केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली होती.
अखेर देवाने आम्हाला न्याय दिला
निकाल जाहीर झाल्यामुळे पीडित पक्षात आनंदाचे वातावरण आहे. पीडित कुटुंबीय न्यायालयाच्या निर्णयावर खूश असून पीडितेच्या पतीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपी आजारपणाचे कारण आणि इतर कारणे सांगून सतत न्यायालयात हजर राहण्याचे टाळत होता. तो न्यायालयाची दिशाभूल करत परदेशात फिरत होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आमच्या कुटुंबीयांवर विविध प्रकारचे दबाव आणण्यात आले. आम्हाला धमक्या देण्यात आल्या. पण शेवटी देवाने आम्हाला न्याय दिला.