‘जाट’ चित्रपटात सनी देओल पहिल्यांदाच दक्षिणात्य दिग्दर्शकाबरोबर काम करत आहे. ‘गदर २’ ला मिळालेल्या यशानंतर सनी पुन्हा चर्चेत आला. इतकेच नव्हे तर बॉबीला देखील बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर त्याचे फॅन्स पसंत करत आहेत. ‘जाट’ या आगामी चित्रपटनिमित्ताने सनी देओल याच्यासोबत मारलेल्या गप्पा.
धर्मेंद्रजी कसे आहेत?
ते आता बरे आहेत आणि सध्या मुंबईतच आहेत. ते लोणावळ्याला जात असतात. त्यांना तिथे जायला खूप आवडते. शेवटी आम्ही शेतकरीच आहोत आणि मातीशी जोडलेले आहोत. इथे फारशी संधी मिळत नाही, पण जेव्हा कधी मी खेड्यापाड्यात चित्रीकरण करत असतो तेव्हा मी शेतामध्येच असलेल्या घराच्या शोधात असतो. आम्हाला माहित असलेली मूंबई सुंदर होती पण आता ती माणसांचे जंगल झाले आहे. मुंबई खूप बदलली आहे. त्यामुळे मी गर्दीपासून दूर पळत राहतो.
हे जाहीरातींचे युग आहे, तुला या अशा मुलाखती देणे आवडत नाहीत ना ?
पूर्वी मला हे सगळे करायला मुळीच आवडायचे नाही आणि मी हे सगळे का करतोय असाच विचार करत बसायचो. पण जसजसा माझा प्रवास पुढे जात गेला, तसतसे मला जाणावले की हा या प्रवासाचा एक भाग आहे आणि तो अतिशय गरजेचाही आहे. सध्या सगळीकडे इतका आवाज आहे, लोक ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांचा वापर करत आहेत. लोक या सगळ्यामध्ये इतके व्यस्त आहेत की तुम्हाला त्यांची दारे ठोठावून त्यांना आठवण करुन द्यावी लागते की माझा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतक्या गोष्टी सुरू असतात की लोकांच्या लक्षात रहात नाही.
तू समाज माध्यमांकडे कसे पहातोस?
तुम्हाला त्यांच्याबरोबरच पुढे जायचे आहे, तुम्ही ते टाळू शकत नाही. जसे आम्हाला चित्रपटासाठी चित्रीकरण करावे लागते, तो आमचा व्यवसायच आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल रडत बसण्यापेक्षा त्याचा आनंद लुटणे उत्तम.
तू समाज माध्यमांचा किती वापर करतोस?
सुरुवातीला मला त्याबद्दल समज नव्हते आणि त्यात माझा खूप वेळ जायचा. आपण वास्तवापासून दूर असल्याची जाणीव झाल्याने मी त्यापासून दूर होण्याचे ठरवले. मी बाहेरच्या जगात रमणारा माणूस आहे. मी फक्त घरात बसून सिनेमा किंवा टीव्ही पाहू शकत नाही, त्यापेक्षा मला निसर्गात जायला, एखादा खेळ खेळायला किंवा ड्राईव्हवर जायला किंवा संगीत ऐकायला जास्त आवडते. पूर्वी आम्ही संगीत अनुभवायचो; ते ध्वनीमुद्रीत (रेकॉर्ड) करायचो, घरी संगीत आणून त्या रेडॉर्ड्स ऐकायचो. ती जादू आता राहीलेली नाही.
उत्तरेतल्या लोकांना तुझा “ढाई किलो का हाथ” खूपच आवडला आहे, आता दाक्षिणात्य लोकांनाही तो पहायला मिळेल?
‘जाट’बाबत जेव्हा दिग्दर्शकाने सुरुवातीला मला सांगितले, तेव्हा मी त्याबाबत सांशक होतो. पण त्यानंतर त्याने मला या चित्रपटासाठी एकदम योग्य असल्याचे समजावून सांगितले. त्याने त्यावर खूपच जोर दिला. मी जरी कोणताही रिमेक केला नसला तरी दाक्षिणात्य चाहत्यांनी माझे काम पाहिले आहे, त्यांना मी माहित आहे. ‘गदर’ने सगळे काही बदलून टाकले आहे. त्यामुळे थोडी आशा आहे.
लोकांना तुला अशा अॅक्शन चित्रपटात पहायला आवडते, तुला एक अभिनेता म्हणून हे करताना किती आनंद मिळतो?
मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतो. मला ज्यातून आनंद मिळत नाही, अशा गोष्टी मी करतच नाही. एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने मला एक विषय ऐकवला होता, पण आम्ही तो करु शकलो नाही. हानू नावाचा दिग्दर्शक आता प्रभासबरोबर चित्रपट करत आहे. त्याला मी खूप आवडतो. त्यामुळे करोना काळात आम्ही काही विषयांवर चर्चा केली होती, पण तो व्यस्त असल्यामुळे आम्हाला दिग्दर्शक मिळत नव्हता. त्यानंतर दिग्दर्शक गोपीचंदने त्याची कथा सांगितली आणि आम्ही त्यावर काम सुरू केले.
नव्या दिग्दर्शकाबद्दल तुला किती विश्वास आहे, तू जोखीम घेत आहेस का?
मी पूर्वीसुद्धा खूप नव्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. हो, काही वेळा चित्रपट चालत नाहीत किंवा पूर्ण होत नाहीत. हे पूर्वी खूप व्हायचे, पण आता गोष्टी बदलल्या आहेत. हे एक वर्तुळ आहे आणि हे होतच रहाणार, पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल.
‘गदर २’ नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
प्रेक्षकांना नेहमीच अपेक्षा असतात, पण ते मला जशा चित्रपटांमध्ये पाहू इच्छित होते, तशा प्रकारचे चित्रपट मी त्यांना देऊ शकलो नाही. तशा प्रकारचे चित्रपट बनवले जात नव्हते. आता ‘गदर’ नंतर त्यांना असा विश्वास आहे, की मी असे चित्रपट करतोय. जे त्यांना पहायचे आहेत. पण, ‘जाट’बाबत मला खात्री आहे की, प्रेक्षका हा चित्रपट पहातील. कारण तो त्यांच्या पठडीतील चित्रपट आहे आणि तो तळागळाशी जोडलेला आहे. हा फक्त अॅक्शनपट नाही तर एक भावनिक चित्रपट आहे.
जेंव्हा तू पडद्यावर अॅक्शन करतोस तेव्हा लोक तुझ्याकडे आदराने पहातात, तू तुझ्या पडद्यावरच्या प्रतिमेकडे कसा पहातोस?
गेल्या अनेक वर्षात ही प्रतिमा हळूहळू तयार झाली आहे. कारण मी एका शक्तीवान नायक साकरत गेलो. जो याप्रकारची अॅक्शन करु शकतो. माझ्या ‘अर्जुन’ या चित्रपटात एक सरळमार्गी तरुण आहे, ज्याला नोकरी मिळत नाही, पण तो हळूहळू चुकीच्या लोकांशी लढण्यात गुंतून पडतो. तो त्या जाळ्यात अडकतो. माझ्या प्रेक्षकांना ती प्रतिमा खूप आवडू लागली. त्याकाळी आमचा प्रेक्षकांवर काय प्रभाव पडतो आहे, हे समजून घेण्यासाठी आमच्याकडे समाज माध्यमे नव्हती. मला नेहमीच असे वाटत आले आहे की, ताकद ही वस्तू उचलण्यात नसते, तर तो ज्या सत्याचा सामना करतो त्याच्यात असते. मी अशा व्यक्तीरेखा साकारल्या, ज्या तो प्रेम करत असलेल्या मुलीसाठी लढतात, त्याच्या कुटुंबाच्या आणि भावांच्या रक्षणासाठी लढतात. लोकांना त्या आपल्याशा वाटल्या. माझ्या मते अभिनय हा उपजत असतो किंवा नसतो. तुम्हाला तुमची भूमिका वास्तववादीपणे साकारावी लागते. दुर्दैवाने मी अभ्यासात कधीच चांगला नव्हतो आणि मी डिसेलेक्सिक मुलगा होतो. पण त्याकाळी आम्हाला डिसेलेक्सिया म्हणजे काय हेच माहित नव्हते. मी खेळात चांगला होतो, पण नंतर मला याबाबत समजले. मी माझे संवाद नीट पाठ करु शकायचो.
तुझे संवाद चांगलेच लोकप्रिय झाले..
हो, जेव्हा तुम्ही प्रसंगानुरुप संवाद बोलता, तेव्हा ते लोकप्रिय होतात. या चित्रपटातहा एक खास ओळ आहे ‘सॉरी बोल’, ती एकदम मस्त आहे. प्रेक्षकांना ती नक्की आवेडल, याची मला खात्री आहे.
तुझ्यामध्ये तुझ्या वडीलांचे गुण आले आहेत, तुझ्या मुलांबाबत काय सांगशील?
माझे वडील हे नेहमीच माझे आदर्श राहीले आहेत आणि मी त्यांचे चित्रपट बारकाईने पाहत आलो आहे आणि मी त्यांच्या बऱ्याच गोष्टी आत्मस्त केल्या आहेत. त्यांच्याकडून खूप काही वारशात मिळाले आहे. त्यामुळे ते पुढच्या पिढीत गेले आहे. पप्पा अष्टपैलू अभिनेता होते आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. ते एकाचवेळी कितीतरी चित्रपट करायचे तर मी मात्र एकावेळी एकच चित्रपट करत आहे. त्यांच्याशी आपली तुलनाच होऊ शकत नाही.
तुझ्या चित्रपटातील संगीत नेहमीच चार्टबस्टर राहीले आहे..
आपल्याला गायला आणि संगीत देता यायला हवे होते, असे मला नेहमीच वाटायचे. मला संगीताची आवड असल्याने माझ्याकडे अल्बमचा मोठा संग्रह आहे. मी शास्त्रीय संगीत सोडून इतर सर्व प्रकारचे संगीत ऐकतो. कारण शास्त्रीय संगीत मला समजत नाही. मला रॅपसुद्धा कळत नाही. मला त्यांचा ठेका आवडतो, पण शब्द कळत नाहीत. आमच्या काळात रॉक संगीत, अॅसिड संगीत आणि अंडरग्राउंड संगीत होते, नव्या गोष्टी येत गेल्या आणि जसजशा पिढ्या बदलत जातात, तसतसे त्यांचा नव्या गोष्टी आपल्याशा वाटू लागतात. सध्या मी सतिंदर सरताज ऐकतो. तो त्याची गाणी स्वतः लिहीतो, गातो आणि संगीतही देतो. त्याने संगीतात डॉक्टरेट केली आहे.
बॉबीची लोकप्रियता शिगेला पोहचली आहे, आता तू त्याच्या कारकिर्दीकडे कसा पहातोस?
एक अभिनेता म्हणून त्याने जेवढ्या गोष्टी पाहिल्या त्याचा मला आनंद आहे, त्याला काम मिळत नसल्याचा मला खूप राग यायचा. तो अतिशय चांगला अभिनेता आहे आणि आता लोक त्याच्या खलनायकाच्या भूमिकांवर प्रेम करू लागले आहेत. शेवटी तो एक भूमिका साकार करणारा एक कलाकार आहे, अगदी अमरीश पुरींप्रमाणेच... आमच्या क्षेत्रात काय होते की, तुमच्यावर एखादा शिक्का बसतो आणि मग तुम्हाला इतर भूमिका मिळत नाहीत. तो इतका देखणा मुलगा आहे, उंचापूरा आहे आणि त्याच्याकडे आत्मविश्वास आहे आणि अभिनेता म्हणून त्याची क्षमता अफाट आहे, तो नाचतोही चांगला. त्याची क्षमता पूर्णपणे वापरली गेली नसल्याचा मला राग येतो. दुर्दैवाने चित्रपट क्षेत्र असेच चालते आणि आपण त्याबाबत काही करू शकत नाही. हे आयुष्याचे वास्तव आहे.
तुझ्या हातात आता खूप चांगले चित्रपट आहेत, लाहोर १९४७ आणि बॉर्डर २ येणार आहेत?
पहिल्या ‘गदर’नंतर मला काम मिळणे बंद झाले. पण ‘गदर २’ नंतर मात्र प्रस्ताव येत आहेत. सुदैवाने, मला खूप चांगल्या भूमिकांसाठी विचारणा झाली आहे आणि मी त्यासाठी खूप उत्सुक आहे. मी ओटीटीवर काम करण्यासही उत्सुक आहे. अशा कितीतरी भूमिका आहेत ज्या आपण चंदेरी पडद्यावर करू शकत नाही.
तुझ्या वडीलांच्या एखाद्या चित्रपटाचा रिमेक करायला आवडेल का?
मला माझ्या वडीलांच्या चित्रपटांचे रिमेक करायला आवडेल. त्यांनी आँखे नावाचा चित्रपट केला होता. ज्यामध्ये ते एक गुप्तहेर होते. खूप छान चित्रपट होता तो. आता गुप्तहेरपटांमध्ये ती जादू नाही.
तू तुझ्या भावना व्यक्त करण्याच्याबाबत खूपच बुजरा होतास, आता तुझ्यात थोडा मोकळेपणा आलेले दिसतो. हा बदल कधी झाला?
मी कुठे जात नाही, मी खासगी माणूस आहे आणि मला माझे एकटेपण आवडते. आता गोष्टी खूपच खुल्या आहेत आणि खूप स्पेस आहे.
दाक्षिणात्य दिग्दर्शक आपल्या नायकांची अद्भूत प्रतिमा सादर करताना दिसतात. त्याबाबत तुला काय वाटते?
गोपीचंद एक चांगला दिग्दर्शक आहे आणि प्रत्येक दिग्दर्शकाच्या स्वतःच्या क्षमता असतात. चित्रपट हा ती सांगणाऱ्याची भावना असते. तो प्रवाही आहे. कलाकारांचे त्याने केलेले सादरीकरण खूप चांगले आहे. दाक्षिणात्य चित्रपट हे आपली परंपरा आणि मातीशी जोडलेले आहेत. शहरांमध्ये ते खूप बदलले आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार ते चित्रपट बनवतात. आपण मातीशी ही जोड मागे सोडली आहे. आयुष्यात त्यांनी जे पाहिले ते त्यांनी साकारले हा त्यांचा दोष नाही. कॉर्पेरेट क्षेत्रही आता यात आले आहे आणि त्याप्रमाणे चित्रपट बनतात. आपण जे चित्रपट पाहत मोठे झालो त्यानुसार चित्रपट बनवणे आपण थांबवले.
सलमानने नुकतेच म्हटले आहे की, सध्या कलाकार मल्टीपल हिरो चित्रपट करत नाहीत..
अगदी तेंव्हाही कलाकारांमधील नाते सारखे असायचे. यात कलाकारांचा दोष नाही, कारण त्याकाळी दिग्दर्शकांचेच चित्रपटावर संपूर्ण नियंत्रण असायचे. आता परिस्थिती बदलली आहे. जेव्हा दिग्दर्शक शॉट ओके करायचा, तेव्हा आम्हाला ते पटायचे. त्यानंतर मॉनिटर आले आणि सगळ्यांनी आपापली मते द्यायला सुरुवात केली. चित्रपटही बदलले. फॅशन बदलली. स्वतः काय करतो, याची आता आपल्याला काळजी नसते, तर दुसरे काय करत आहेत, यामध्येच आपल्याला जास्त रस असतो. आपण स्वतःला काय शोभून दिसते हे पहात नाही तर ब्रॅंडस् चाच जास्त विचार करतो. त्यामुळे सर्जनशीलता आता हरवली आहे.
सध्या पडद्यावर दिसणाऱ्या अॅक्शनबद्दल तुला काय वाटते? सध्या कोण चांगली अॅक्शन करतो, असे तुला वाटते?
मी खूप चित्रपट पाहिलेले नाहीत, त्यामुळे मी इतरांबद्दल बोलू शकत नाही. माझ्या मते माझा मुलगा खूप चांगले अॅक्शन करतो. पल पल दिल के पास मध्ये एक छोटे अॅक्शन दृष्य होते, त्याने ते खूप चांगल्या प्रकारे केले. त्याने त्याच्यातील आक्रमकता इतकी चांगली दाखवली आहे. मी एकच चूक केली ती, मी त्याच्या करीयरची सुरुवात एक प्रेमकथेतून केली, मी जर तो अॅक्शनपट बनवला असता, तर तो चांगला चालला असता. जेव्हा मी चित्रपटाचे ट्रेलर्स पहातो, तेव्हा मला वाटते की प्रत्येकजण स्वतःसाठी चांगलेच करत आहे. त्यांची प्रत्येकाची स्वतःची शैली आहे, आता ती चांगली की वाईट हे प्रेक्षक ठरवतील. मी नेहमीच तळागळाशी जोडलेला आहे. माझ्या मते ब्रुस ली त्याच्या व्यक्तिरेखेचा राग खूप चांगल्या प्रकारे दाखवत असे.
एखादा आवडता स्टंट जो खूप कठीण होता?
स्टंट करताना काहीच कठीण नसते, माझ्यासाठी तो एखाद्या खेळाप्रमाणे असतो, मी परिपूर्ण होण्याची चिंता करत नाही. जरी मी जखमी झालो तरी मी त्याकडे दुर्लक्ष करतो.
रॉ प्रकाराच्या अॅक्शनची कमतरता जाणवते का?
कमतरता नाही जाणवत, पण ती होत नाही कारण आपल्याकडे तशा प्रकारच्या अॅक्शनवर विश्वास अललेले दिग्दर्शक, अॅक्शन करणारे, विषय किंवा अभिनेते नाहीत. मी अर्जुन, बेताब किंवा डकैतमध्ये जी अॅक्शन केली होती ती करताना आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही त्यात गुंतून गेलो होतो. आम्ही त्यात प्रत्यक्ष सहभागी असून आणि दोन ते तीन दिवस त्यासाठी तालीम करायचो. राहूल रवैल हा खूप चांगला दिग्दर्शक होता आणि त्याला त्याचे काम माहित होते.